Amravati Election Results 2026 : अमरावतीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज; युवा स्वाभिमान पक्ष येणार का मदतीला ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:54 IST2026-01-17T12:54:14+5:302026-01-17T12:54:50+5:30
Amravati : अमरावती महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांमध्ये बराच खल झाला. दरम्यान, चर्चा, मंथन आणि बैठकांचा रतीब पार चालला.

Amravati Election Results 2026 : BJP needs hunchbacks to form government in Amravati; Will Yuva Swabhiman Party come to help?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांमध्ये बराच खल झाला. दरम्यान, चर्चा, मंथन आणि बैठकांचा रतीब पार चालला. मात्र, 'एकला चलो'चा नारा देत सर्वच पक्षांनी रिंगणात उमेदवार उभे केले. तथापि, शुक्रवारी निकाल हाती आल्यानंतर सत्तापक्ष भाजपने २५ जागांवर विजय मिळवला असला तरी गतवेळीपेक्षा २० जागांवर पीछेहाट झाली आहे. आता भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज लागणार असून, मित्र पक्ष असलेल्या युवा स्वाभिमानला सोबत घ्यावे लागणार आहे.
यंदा निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान आणि एमआयएमने जोरदार मुसंडी मारली आहे; परंतु राष्ट्रवादी (शरद पवार) ला खातेदेखील उघडता आले नाही. प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप '५५ प्लस'चा नारा दिला होता; पण निकाल काही वेगळाच लागला आहे.
काँग्रेसने प्रचारात कोणताही बडेजाव न करता मतदारांवर फोकस केला होता. काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला आहे. माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत हे दोन्ही दिग्गज विजयी झाले असून, त्यांच्या प्रभागात 'सब कुछ' काँग्रेस असा निकाल लागला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) ने थेट ८५ जागांवर उमेदवार उभे केले होते; पण ११ जागांवर विजय मिळाला. गत निवडणुकीत तीन जागांवर विजय मिळवणाऱ्या युवा स्वाभिमानने यंदा १५ जागांवर विजय खेचून आणला आहे. आमदार रवी राणांची जादू चालली, हे निकालाने स्पष्ट झाले. १२० अपक्ष उमेदवार रिंगणात असले तरी एकालाही विजय मिळवता आला नाही.
मात्र, काही अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, व अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या जाहीर सभासुद्धा फार करिष्मा करू शकल्या नाहीत, हे विशेष. उद्धवसेना, बसप आणि शिंदेसेनेला अपेक्षेप्रमाणे यश मिळविता आले नाही.