अमरावती शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांची ६२ टक्के पदे रिक्त; रुग्णांना उपचार मिळणार कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:33 IST2025-08-01T19:32:14+5:302025-08-01T19:33:21+5:30

Amravati : शासकीय रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला

62 percent of doctor posts are vacant in Amravati government hospitals; How will patients get treatment? | अमरावती शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांची ६२ टक्के पदे रिक्त; रुग्णांना उपचार मिळणार कसे?

62 percent of doctor posts are vacant in Amravati government hospitals; How will patients get treatment?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
जिल्ह्याचा आरोग्याचा भार असलेल्या शासकीय रुग्णालयात रिक्त पदांचा गुंता कायम आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे क्लास वन डॉक्टरांची ५६ पदे मंजूर आहेत; प्रत्यक्षात केवळ २१ पदे भरली असून, ३५ पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे तब्बल ६२ टक्के पदे रिक्त असून उर्वरित ३८ टक्के डॉक्टरांवरच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचा भार आहे.


जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. आजही गोरगरीब रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयच संजीवनी म्हणून काम करतात; परंतु येथे रिक्त पदांमुळे उर्वरित डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, एक जिल्हा स्त्री रुग्णालय सहा उपजिल्हा रुग्णालये आठ ग्रामीण रुग्णालये, चार ट्रॉमा केअर युनिट, तर एक महिला व बालरुग्णालय आहे. या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. सर्वाधिक रुग्णांची गर्दी ही जिल्हा रुग्णालयात होते; परंतु अनेकवेळा डॉक्टर; तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात वर्ग एक ते चारपर्यंत एकूण १५६९ पदे मंजूर आहे. त्यातील ३३३ पदे हे रिक्त आहेत. 


सुपरच्या 'फेज टू'मध्ये ५० पदे रिक्त
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथील फेज टू इमारत मागील तीन वर्षांपासून कार्यान्वित झाली आहे. या ठिकाणी हृदयरोग, कर्करोग, तसेच मेंदू विकारावरील विविध शस्त्रक्रिया होत आहेत; परंतु येथे मंजूर असलेल्या ५२ क्लास वन अधिकाऱ्यांपैकी केवळ २ पदेच भरलेली असून, ५० पदे अजूनही रिक्त आहेत. 


आरोग्यमंत्री लक्ष देणार का ?
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे १५ ऑगस्टपूर्वी जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १९ जुलैला घेतलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत सांगितले होते. त्यामुळे आरोग्य विभागातील या रिक्त पदांचा गुंता ते कसे सोडविणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


जिल्हा रुग्णालयात १३ क्लास वन डॉक्टर्स नाहीत
जिल्हा रुग्णालयात क्लास वन डॉक्टरांची २२ पदे मंजूर असून, यातील केवळ ९ पदे भरली असून १३ पदे रिक्त आहेत. तर जिल्हा स्त्री रुग्णालयात १५ पैकी १२ रिक्त, अचलपूर महिला व बालरुग्णालयात ५ पदांपैकी ४ रिक्त आहेत. त्याचबरोबर दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय, चांदूर बाजार उपजिल्हा रुग्णालय, अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा ग्रामीण रुग्णालय, भातकुली ग्रामीण रुग्णालय येथे एकच क्लास वन डॉक्टरांचे पद मंजूर असून ते देखील रिक्त आहेत.

Web Title: 62 percent of doctor posts are vacant in Amravati government hospitals; How will patients get treatment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.