'मला कुणी समजून घेत नाही..' सुसाईड नोट लिहून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 17:28 IST2022-05-12T17:26:35+5:302022-05-12T17:28:27+5:30
शेजाऱ्यांच्या मदतीने तिला येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.

'मला कुणी समजून घेत नाही..' सुसाईड नोट लिहून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : शहरातील ओंकारखेडा परिसरात वास्तव्याला असलेल्या एका १४ वर्षीय मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी ही घटना घडली.
पोलीस सूत्रांनुसार, मृत मुलीचे वडील शेतात गेले होते, लहान बहीण घरातून बाहेर पडली होती. आईदेखील कामानिमित्त बाहेर गेली होती. ती घरात आल्यावर ही घटना तिच्या दृष्टीस पडली. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. ती नवव्या वर्गात शिकत होती. नांदगाव पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनासाठी मृतदेह यवतमाळ येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी प्राथमिक तपास हेडकॉन्स्टेबल विवेक राणे व पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता नागपुरे हे करीत आहेत. ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
मुलीने लिहिलेली मृत्यूपूर्व चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्याचे कळते. मला कुणी समजून घेत नाही, असे त्यात लिहिले असून, त्यापासून फारसा अर्थबोध होत नाही. तथापि, याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी सांगितले.