Murtijapur Election Results: Harish Pimple finally wins | मुर्तीजापूर निवडणूक निकाल : हरीश पिंपळे यांचा अखेर निसटता विजय
मुर्तीजापूर निवडणूक निकाल : हरीश पिंपळे यांचा अखेर निसटता विजय

- संजय खांडेकर
अकोला : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत भाजपचे विद्यमान आमदार हरीष पिंपळे यांनी वंचित बहूजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांच्यावर निसटता विजय मिळविला. पिंपळे यांना ५९२२७ मते मिळाली, तर प्रतिभाव अवचार यांना ५७६१३ मते मिळाली. पिंपळे १०१० मतांनी विजयी झाले. दरम्यान, प्रतिभा अवचार यांनी आक्षेप घेतल्याने अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला नाही. 

जिल्ह्यात मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात काट्याची लढत झाली. ही लढत मतमोजणीच्या अखेरपर्यंत वादात राहिली. भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांनी अखेर निसटता विजय मिळविला; मात्र आक्षेपामुळे येथील चित्र प्रशासकीय स्तरावर स्पष्ट झाले नाही.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांनी भाजपच्या हरीश पिंपळेंना मागे टाकीत आघाडी घेतली. सलग २६ फेरीपर्यंत अवचार आघाडीवर राहिल्या; मात्र २७ व्या फेरीत हरीश पिंपळे यांनी १५२ मतांची आघाडी घेतली.
२७ व्या फेरीपर्यंत भाजपचे हरीश पिंपळे यांना ५६६७१, वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांना ५६,५१९ , राष्ट्रवादीचे रवी राठी यांना ३९९०६ मते मिळाली होती.
भाजप-वंचितमधील कमी मतांचे अंतर आणि त्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपामुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पेच कायम होता, त्यामुळे २८ व्या फेरीची मतमोजणी आणि निकाल उशिरापर्यंत थांबवून ठेवण्यात आला.
राजकुमार नाचणे यांनी भाजपात केलेली बंडखोरी आणि पिंपळेंच्या वाचाळ वक्तव्यामुळे मतदारसंघात प्रचंड नाराजी पसरली होती; मात्र खासदार संजय धोत्रे त्या उपरांतही पिंपळे यांना घेऊन मतदारसंघात प्रचारार्थ फिरलेत. त्यामुळे पिंपळे यांना निसटता विजय काबीज करता आला; मात्र प्रतिभा अवचार यांना विजयाने हुलकावणी दिली. अवचार यांच्यापेक्षा जास्त मते पिंपळे यांना अखेर फेरीत मिळाली. त्यावर अवचार यांचा आक्षेप असल्याने प्रशासनाने मतमोजणी जाहीर केली नाही.

 

Web Title: Murtijapur Election Results: Harish Pimple finally wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.