Municipal elections 2026: मतदाराला चार मते द्यावीच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:51 IST2026-01-06T16:50:07+5:302026-01-06T16:51:42+5:30
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ८० सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत असून प्रत्येक प्रभागामधून चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Municipal elections 2026: मतदाराला चार मते द्यावीच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'?
अकोला महापालिकेत ८० सदस्य निवडीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी आहे. चार सदस्य संख्येनुसार प्रभाग रचना मंजूर आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते द्यावीच लागणा आहेत, मग ते उमेदवार असो की नोटा. ईव्हीएमचे चार वेळा बटण दाबून लोकशाहीचा हक्क बजावणे अनिवार्य आहे. त्याशिवाय मतदान केंद्रातून मतदारांना बाहेर पडता येणार नाही, अशी राज्य निवडणूक आयोगाचे गाइडलाइन आहे. एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल चार वेळा मतदान करावेच लागेल, अशी स्पष्ट नियमावली आहे.
महापालिका निवडणुकीत आरक्षणानुसार 'अ', 'ब', 'क', 'ड' यानुसार प्रत्येक प्रभागात चार उमेदवारांना मतदारांना निवडून द्यायचे आहे. मात्र, प्रभागात बरेचदा काही मतदारांना त्यांच्या पसंतीनुसार उमेदवार नसतात, अशावेळी काहीजण दोन किंवा तीन उमेदवारांना मते देण्याचे कर्तव्य बजावतात.
अन्यथा केंद्राध्यक्षांना मतदान प्रक्रिया पूर्ण करावी लागेल!
एखाद्या मतदाराने पसंतीच्या उमेदवाराला मत देण्यास किंवा वरीलपैकी एकही नाही, 'नोटा'या पर्यायासमोरील बटण दाबण्यास नकार दिला तर मतदान केंद्राध्यक्षांनी बॅलेट युनिटवरील उमेदवारांचे नावासमोरील दिवे एखादा पुठ्ठा अथवा पुस्तक ठेवून झाकावेत.
मतदान केंद्रात उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधींना बरोबर घेऊन त्यांच्या साक्षीने ज्या मतपत्रिकेवरील मतदान अपूर्ण राहिले आहे, त्या मतपत्रिकेवरील 'वरीलपैकी एकही नाही' (नोटा) या पर्यायासमोरील बटण स्वतः दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी.
तर चौथे बटण 'नोटा'चे दाबावे लागेल!
प्रभागात चार उमेदवार असताना एखाद्या मतदाराला तीनच उमेदवारांना मते द्यायचे असल्यास चौथे 'नोटा'चे बटण दाबावे लागेल, त्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौथ्या मताचे काय होणार?
ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करताना मतदाराने तीनच उमेदवारांना मतदान केले आणि चौथे बटण हे 'नोटा' दाबले तर ते मत कोणत्याही उमेदवारांना झाले नसून ते गणले जात नाही. त्या मताची गणना 'वरीलपैकी एकही नाही' अशी केली जाते. मतदान यंत्राच्या बॅलेट युनिटवर शेवटचे १६ वे 'नोटा' बटण ठेवले आहे.
५ लाख ५० हजारांवर मतदार
चारपैकी एकही उमेदवार मतदारांना योग्य वाटत नसल्यास अशावेळी 'नोटा' बटण दाबून मतदान करावे लागेल. महापालिकेत २० प्रभागांत ४६९ उमेदवार मैदानात असून ५ लाख ५० हजार ६० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जाहीर झाल्यानंतर प्रभाग रचना निवडणूक घ्यावी लागते. महापालिकेसाठी चार सदस्य संख्येनुसार मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते देणे बंधनकारक आहे. मतदारांना उमेदवार नापसंत असल्यास ते 'नोटा' बटण दाबून शकतात. मतदान केल्याशिवाय मतदाराला केंद्रातून बाहेर जाता येणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील लहाने यांनी दिली.