घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र द्या अन् त्यानंतरच उमेदवारी दाखल करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:27 IST2025-12-30T18:27:12+5:302025-12-30T18:27:12+5:30
महापालिका निवडणुकीत प्रथमच नवी अट; इच्छुकांची धावपळ, अर्ज बाद होण्याची भीती

घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र द्या अन् त्यानंतरच उमेदवारी दाखल करा!
अकोला : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना एका नव्या आणि अनपेक्षित अटीचा सामना करावा लागत आहे. उमेदवाराच्या स्वतःच्या घरात शौचालय आहे की नाही, याची महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रत्यक्ष तपासणी करून 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकांच्या इतिहासात प्रथमच अशी अट लागू झाल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. शहरातील सर्व २० प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत असून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), शिंदेसेना, उद्धवसेना, तसेच मनसेकडून इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. आतापर्यंत २५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या नव्या अटीमुळे अनेक इच्छुक उमेदवार गोंधळात आहेत.
अर्जासोबत लागतात ही प्रमाणपत्रे/एनओसी
उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्रासह विविध ना हरकत दाखलेही जोडावे लागणार आहेत. यात अधिवास अथवा रहिवासी दाखला, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता कर भरल्याचा दाखला, वीज, पाणी थकबाकी नसल्याचा दाखला, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत प्रतिज्ञापत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.
आता शौचालयाचेही प्रमाणपत्र आवश्यक
यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्जासोबत घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जोडण्याचे बंधनकारक केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा नियम करण्यात आला असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे एनओसी बंधनकारक केली आहे.
आरोग्य विभाग घरी येऊन तपासणी करणार
घरी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवारांना महापालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. शौचालय वापरात आहे का, याची खातरजमा करतील. या पाहणीनंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
...तर अर्ज बाद किंवा अपात्रतेची शक्यता
शौचालय प्रमाणपत्र नसल्यास अर्ज अवैध ठरू शकतो. तसेच, खोटी माहिती दिल्यास उमेदवारी धोक्यात येऊ शकते. शिवाय निवडणुकीनंतरही अपात्रतेचा धोका कायम असतो.
जुळवाजुळव करताना उमेदवारांच्या नाकीनऊ
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारांसह इच्छुकांनी ना हरकत दाखले, प्रमाणपत्रासाठी धावपळ सुरू केली आहे.
प्रमाणपत्रांसाठी मनपाची काय तयारी?
महापालिकेकडून दाखले देण्यासाठी एक खिडकी सुरू केली आहे. या विभागात एनओसीसाठी गर्दी होत आहे. प्रभागनिहाय अर्ज तपासणीचे नियोजन केले आहे. अर्ज प्रक्रिया माहितीसाठी विशेष काउंटर सुरू केले आहे.