Maharashtra Election 2019: Sharma and Savarkar prices within ten paise | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शर्मा आणि सावरकरांचे भाव दहा पैशांच्या आत
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शर्मा आणि सावरकरांचे भाव दहा पैशांच्या आत

- संजय खांडेकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार २१ आॅक्टोबर २०१९ रोजी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी कमी असल्याने प्रत्येक पक्ष आणि उमेदवारांचे कार्यकर्ते मतांची गोळाबेरीज करण्यात लागले आहे. याच अंदाजावर जिल्ह्यातील सटोडियांनी राजकीय सट्टाबाजार गरम केला असून, कोट्यवधीची खायवाडी सुरू आहे. मंगळवारी चाललेल्या सट्टाबाजारात अकोला पश्चिमचे भाजपचे उमेदवार गोवर्धन शर्मा यांचे भाव ५ ते ७ पैसे असून, अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर सावरकर यांचे भाव ७ ते १० पैसे चालले. त्यामुळे सट्टाबाजाराच्या दृष्टीने अकोला शहरातील दोन्ही भाजपचे उमेदवार सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.
अकोला जिल्ह्यातील सर्वात चुरशीची लढत झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. सोमवारी रात्री भाजपच्या गोवर्धन शर्मा यांचे भाव ५० पैसे तर काँग्रेसच्या साजिद खानचे भाव ७० पैसे होते. मंगळवारी हे भाव पुन्हा घसरून ५ ते ७ पैशांवर येऊन ठेपले. मदन भरगड यांचे भाव मात्र दीड रुपयांच्या खाली आले नाही.
अकोला पूर्वमध्येही काट्याची लढत दाखविली जात आहे. भाजपच्या रणधीर सावरकरांचे भाव सोमवारी ५० पैसे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी वंचितच्या हरिदास भदे यांचे भाव ८० पैसे होते. मंगळवारी मात्र सावरकरांचे भाव ७ ते १० पैशांवर स्थिर झाले. काँग्रेसचे उमेदवार विवेक पारसकर यांचे भाव साडेतीन रुपयांवरून खाली सरकले नाही.
अकोट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकळे यांचे भाव ९० पैसे असून, प्रहारचे तुषार पुंडकर १ रुपयांवर आहे. याच स्पर्धेत काँग्रेसचे संजय बोडखे असून, त्यांचे भाव १.१० रुपयांवर स्थिर आहे.
सट्टाबाजाराच्या दृष्टीने भारसाकळे, पुंडकर आणि बोडखे मागे-पुढे आहेत. बाळापूरमध्ये वंचितचे उमेदवार डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांचे भाव ५५ पैसे असून, शिवसेनेच्या नितीन देशमुख यांचे भाव ६० पैसे आहे. त्यांचे पाठोपाठ एमआयएमचे उमेदवार डॉ. रहेमान खान यांचे भाव सट्टाबाजारात सुरू आहे.
मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपच्या हरीश पिंपळेंचे भाव ९० पैसे आहे. तर वंचितच्या प्रतिभा अवचार आणि राष्ट्रवादीचे रवी राठी यांचे भावदेखील १ रुपयाच्या घरात आहे. मूर्तिजापुरातील लढतीत सटोडियेदेखील संभ्रमात आहेत. त्यांचे गणित येथे बिघडण्याची शक्यत वर्तविली जात आहे.
सटोडिया बाजारातील कमीत-कमी भाव उमेदवाराच्या विजयाचे संकेत असतात. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील चित्र सटोडिया बाजारातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, २४ आॅक्टोबर रोजी यातील अंदाज किती खरे ठरतात, याकडे अकोलेकरांचे आणि राजकारण्यांचे लक्ष लागून आहे.


Web Title: Maharashtra Election 2019: Sharma and Savarkar prices within ten paise
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.