स्वपक्षाचे तिकीट मिळाले तर ठीक, अन्यथा इतर पक्ष वा अपक्ष!; इच्छुकांचा ‘प्लॅन बी’ तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:21 IST2025-12-29T16:21:03+5:302025-12-29T16:21:24+5:30
या पार्श्वभूमीवर अनेक प्रभागांमध्ये थेट प्रचारालाही सुरुवात झाल्याचे चित्र आहे. अपक्ष उमेदवारांचे महत्त्व नेहमीच निर्णायक ठरले आहे. निवडणुकांनंतर जिंकलेल्या अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेच्या आघाड्या तयार केल्या जात असल्याचे वास्तव वारंवार समोर आले आहे.

स्वपक्षाचे तिकीट मिळाले तर ठीक, अन्यथा इतर पक्ष वा अपक्ष!; इच्छुकांचा ‘प्लॅन बी’ तयार
अकोला : मतदारांच्या पसंतीचा अहवाल, आर्थिक क्षमता आणि निवडणूक खर्च उचलण्याची ताकद या निकषांवरच उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत नेत्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे तिकीट मिळाले तर ठीक, अन्यथा कोणत्याही परिस्थितीत अपक्ष किंवा जो पक्ष तिकीट देईल. त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवायचीच, अशी ठाम भूमिका भाजपसह काँग्रेस आणि अनेक इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक प्रभागांमध्ये थेट प्रचारालाही सुरुवात झाल्याचे चित्र आहे. अपक्ष उमेदवारांचे महत्त्व नेहमीच निर्णायक ठरले आहे. निवडणुकांनंतर जिंकलेल्या अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेच्या आघाड्या तयार केल्या जात असल्याचे वास्तव वारंवार समोर आले आहे.
तिकीट मिळविण्यासाठी लावली जोरदार फिल्डिंग -
राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तिकीट मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र, युती–आघाडी धर्मामुळे अनेक प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्त्यांची नावे ऐनवेळी कापली जाण्याचे अनुभव यापूर्वीही आले आहेत.
त्यामुळे आधी पक्षाकडे दावेदारी, त्यानंतर तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढत, अशी दुहेरी रणनीती अनेक इच्छुकांनी आधीच ठरवून ठेवली आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
युती-आघाडीमुळे वाढणार बंडखोरी?
पालिकेच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), भाजप, शिवसेना (दोन्ही गट) हे प्रमुख सहा पक्ष आहेत. या सर्व पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे.
पक्षाचा अंतिम निर्णय काय होतो, हे पाहूनच काही इच्छुक थेट बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.