असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:28 IST2026-01-05T15:27:02+5:302026-01-05T15:28:12+5:30
अकोला महापालिकेत एमआयएम पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पक्षाच्या उमेदवारांसाठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. या सभेत गोंधळ उडाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत गोंधळ; पोलिसांना करावा लागला बळाचा वापर!
अकोला महानगरपालिका निवडणुकीत 'एमआयएम'च्या उमेदवारांसाठी रविवार, ४ जानेवारी रात्री अकोला शहरात आयोजित 'एआयएमआयएम'चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेत गोंधळ झाला. सभा आटोपताच ओवैसी यांना पाहण्यासाठी मंचाजवळ प्रचंड उसळलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
अकोला महापालिका निवडणुकीत 'एमआयएम' उमेदवारांच्या प्रचारासाठी महानगरपालिका अकोला शहरातील आरपीटीस रोडवरील शाह जुल्फीकार दरगाह मैदानात खा. ओवैसी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला 'एमआयएम'च्या कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ओवैसी यांचे भाषण संपण्याच्या मार्गावर असताना, त्यांना पाहण्यासाठी मंचासमोर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याने सभेत गोंधळ झाला. भाषण संपताच कठडे ओलांडून मंचासमोर प्रचंड झालेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
काँग्रेस आमदाराला काढला चिमटा !
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमची चुक झाली, अकोला पश्चिम मतदारसंघात आम्ही उमेदवार उभा केला नाही, असे सांगत खा. ओवैसी यांनी काँग्रेसचे आमदार साजीदखान पठान यांचे नाव न घेता, त्यांना चिमटा काढला. तसेच काँग्रेस पक्षाच्या धोरणावरही त्यांनी टिका केली. नागरिकांच्या मतांचा वापर काँग्रेसने केवळ सत्ता उपभोगण्यासाठी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
समस्या सोडविण्यासाठी मताचा योग्य वापर करा!
शहरातील समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत बहुमूल्य मताचा योग्य वापर करण्याचे आवाहन खा. असदुद्दीन ओवैसी यांनी केले.
मुस्लीम आणि दलित लोकवस्तीच्या भागांत रस्ते, पाणी आदी सुविधा का नाहीत, असा सवाल करीत अकोला शहरातील काही भागांतच विकासकामे असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील समस्या सोडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या मताचा योग्य वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रात जन्मदाखल्याचे वितरण बंद केल्याने राज्यातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचे सांगत महायुती सरकारवर खा. ओवैसी यांनी टीका केली.