Baliram Sirsarkar's tendency towards NCP due to the possibility of opportunity | संधीच्या शक्यतेमुळे  बळीराम सिरस्कार यांचा राष्ट्रवादीकडे कल

संधीच्या शक्यतेमुळे  बळीराम सिरस्कार यांचा राष्ट्रवादीकडे कल

अकोला : भारिप-बमसं, वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेले माजी आमदार बळीराम सिरस्कार यांना भविष्यातील राजकारणासाठी कुठे अधिक संधी उपलब्ध आहेत, याचा ताळेबंद पाहता त्यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे आता पुढे येत आहे. बाळापूर मतदारसंघात काँग्रेसकडे दोन प्रबळ उमेदवार असल्याने त्या पक्षात त्यांच्यासाठी काही करता येण्यासारखे नसल्याने त्यांनी पुढील दिशा बदलल्याचे संकेत आहेत.
वंचित बहुजन आघाडीमधून माजी आमदार भदे बाहेर पडले. राजकारणातील पुढील भवितव्य ठरवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक साधत पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी भेट नियोजित केली आहे. त्याचवेळी माजी आमदार सिरस्कार यांचे तळ््यात-मळ््यात सुरू होते. भदे यांनीही त्यांच्या वाटचालीबद्दल काही सांगण्यास नकार दिला होता. त्यांचा निर्णय काय होईल, हे अनिश्चित असताना ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली; मात्र पुढील राजकीय भवितव्य काय, याचा विचार करता काँग्रेसमध्ये त्यांना जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या मूळ बाळापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये दोन प्रबळ दावेदार आहेत. त्यामध्ये अ‍ॅड. नातिकोद्दीन खतीब, तर माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, त्यांचे पुत्र प्रकाश तायडेही सक्रिय आहेत. त्यामुळे या दोन दावेदारांना डावलून काँग्रेसमध्ये त्यांना काही मिळेल, हा आशावाद फोल ठरू शकतो. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची शक्यता गृहीत धरल्यास बाळापूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आहे. या मतदारसंघात उमेदवारी केलेले संग्राम गावंडे मतदारसंघाबाहेरचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यास या मतदारसंघात संधी मिळू शकते, अशी अपेक्षा त्यांना वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेसचा पर्याय वगळून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता बळावली आहे.

 

Web Title: Baliram Sirsarkar's tendency towards NCP due to the possibility of opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.