Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीची मतमोजणी सहा ठिकाणी! इव्हीएमसाठी स्ट्राँग रूमही निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:10 IST2026-01-07T13:08:32+5:302026-01-07T13:10:04+5:30
अकोला महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता एक आठवडाच उरला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदानाच्या तयारी बरोबरच मतदानानंतर मतदान यंत्र ठेवण्याच्या जागेची तयारी पूर्ण केली जात आहे.

Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीची मतमोजणी सहा ठिकाणी! इव्हीएमसाठी स्ट्राँग रूमही निश्चित
Akola Muncipal Election Voting, Results 2026: अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून शुक्रवारी (१६ जानेवारी) सकाळी १० वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक निकालानंतर होणारी गर्दी व संभाव्य वाद टाळण्यासाठी यंदा प्रथमच सहा स्वतंत्र ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून सर्व राजकीय पक्षांकडून जाहीर प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान, निवडणूक विभागाकडून मतदान व मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीवर भर देण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या २० प्रभागांतील एकूण ८० जागांसाठी ही निवडणूक होत असून ४६९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने मतदारांना इव्हीएमवरील चार बटणे दाबावी लागणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी प्रथम पोस्टल मतांची, त्यानंतर इव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे.
सहा अधिकारी नियुक्त
निवडणूक विभागाने प्रथमच सहा ठिकाणी मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकारी व स्वतंत्र मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
इव्हीएम ज्या स्ट्रांग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत, त्याच ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे प्रमुख अनिल बिडवे यांनी दिली.
आयुक्तांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी सर्व मतमोजणी केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. यापूर्वी एकाच ठिकाणी मतमोजणी होत होती; मात्र निकालाच्या दिवशी होणारी गर्दी व त्यातून निर्माण होणारे तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता यंदा सहा वेगवेगळी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रभागनिहाय मतमोजणी केंद्रे
प्रभाग १, २ व ७ : शासकीय धान्य गोदाम, जिल्हाधिकारी कार्यालय
प्रभाग ३, ४, ५ व ६: अकोला जिल्हा मराठा मंडळ, रामदासपेठ
प्रभाग ८, ९, १० व १७: नीमवाडी पोलिस वसाहत येथील मल्टीपर्पज हॉल
प्रभाग ११, १२ व १८ : राजमाता जिजाऊ अभियंता प्रशिक्षण केंद्र, रेल्वेस्टेशनजवळ
प्रभाग १३, १४ व १५ : जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, सिव्हिल लाइन चौक
प्रभाग १६, १९ व २० : शासकीय धान्य गोदाम, खदान, मंगरूळपीर रोड