माजी महापौर, माजी नगरसेवकांसह १६४ उमेदवारांची रिंगणातून माघार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:11 IST2026-01-03T16:11:18+5:302026-01-03T16:11:39+5:30
अकोला महानगरपालिका निवडणूकः सर्व राजकीय पक्षांचे अनेक इच्छुक हटले मागे

माजी महापौर, माजी नगरसेवकांसह १६४ उमेदवारांची रिंगणातून माघार!
अकोला : महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार, २ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौर सुमनताई गावंडे, काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील, भाजपचे दोन माजी नगरसेवक गोपी ठाकरे व सविता ठाकरे यांच्यासह उद्धवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने आणि शिंदेसेनेच्या शहर प्रमुखासह माजी नगरसेविकेच्या पतीने आणि एआयएमआयएमच्या महिला उमेदवाराने रिंगणातून माघार घेतली आहे. भाजपचे उपमहापौर राजेंद्र गिरी यांनी गुरुवारीच अर्ज मागे घेतला होता. शुक्रवारी काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीच्या १७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अनेक प्रभागांतील लढर्तीचे स्वरूप बदलले आहे.
सहा झोनमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६३३ जणांपैकी १६४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात एकूण ४६९ उमेदवार कायम राहिले आहेत. प्रभाग क्रमांक ११ अ मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख इब्राहिम शेख कासम, प्रभाग १२ अ मधून भाजपचे सुगत धनंजय गवई, प्रभाग १२ क मधून भाजपच्या दीपिका नरेंद्र पाडिया, राजेश्वरीअम्मा शर्मा, मधु संतोष पांडे यांच्यासह शिंदेसेनेचे जगजितसिंह विर्क, शिंदेसेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड यांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग १८ क मधून माजी नगरसेवक रूपाली सोमनाथ अडगावकर, एमआयएमच्या उमेदवार नुसरत परवीन आरिफ खान यांचा माघार घेणाऱ्यांत समावेश आहे. प्रभाग १४ ब मधून सुनीता सुनील मुरूमकार, प्रभाग १४ ड मधून वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पातोडे, विजय बोचरे, प्रभाग १५ अ मधून भाजपचे माजी नगरसेवक गोपी उर्फ सुदेश ठाकरे, प्रभाग १५ ब मधून माजी नगरसेविका सविता ठाकरे, प्रभाग १५ ड मधून किशोर अलिमचंदानी यांनी अर्ज मागे घेतले.
यासोबतच प्रभाग ६ ड मधून काँग्रेसचे माजी महापौर सुरेश पाटील, प्रभाग ५ ब मधून माजी नगरसेवक नम्रता मनीष मोहोड, वंचितचे श्रीकांत ढगेकर, प्रभाग क्रमांक ३ मधील शिंदेसेनेच्या उमेदवार संगीता शुक्ल यांनी माघार घेतली आहे.
माघार घेणाऱ्यांत भाजप, काँग्रेस आणि वंचितचे सर्वाधिक
शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये भाजपच्या माजी महापौरांसह उपमहापौर आणि दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे; पण, माजी नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. काँग्रेसच्या माजी महापौरांसह चार नगरसेवकांनी उमेदवारी मागे घेतली.
काहींनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा अर्ज रद्द झाला तर, या दृष्टिकोनातून डमी अर्ज भरला होता. शिंदेसेना आणि उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांचा अर्ज वैध ठरल्यामुळे त्यांच्या अर्धांगिनींनी अर्ज मागे घेतले. वंचित बहुजन आघाडीच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काहींनी माघार घेतली, तर काहींनी अर्ज कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.
काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि एमआयएमचे तिकीट मिळालेल्या महिला उमेदवारानेही रिंगणातून माघार घेतली. सर्वाधिक दिलासा भाजपला मिळाला आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी माघार घेतली असली तरी, काँग्रेसला एमआयएमकडून कडवे आव्हान मिळू शकते.
आज चिन्ह वाटप
अकोला महापालिका निवडणूक रिंगणातील ५४९ उमेदवारांना ३ जानेवारी रोजी प्रशासनाकडून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवाराला कोणते चिन्ह मिळते. याकडे अपक्ष उमेदवारांचे लक्ष लागले आहे.