Voting for Shirdi Lok Sabha Constituency tomorrow: 15 lakh voters will vote | शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान : 15 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान : 15 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

शिर्डी : शिर्डीलोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही मतदानाची वेळ असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील 1710 मतदान केंद्रावर 15 लाख 84 हजार 303 मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. यात 8 लाख 21 हजार 401 पुरुष व 7 लाख 62 हजार 832 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक (पोलींग पार्टी) आज रविवारी मतदान साहित्यासह रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदारांनी मुक्त व निर्भयपणे त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी पी.एल. सोरमारे यांनी केले आहे.
या निवडणुकीत 15 लाख 84 हजार 303 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1710 मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी 3420 बॅलेट युनिट, 1710 कंट्रोल युनिट व 1710 व्हीव्हीपॅट वापरले जाणार आहेत. वाटप करण्यात आलेले साहित्य आणि मतदान यंत्रे घेऊन पुरेशा बंदोबस्तात संबंधित पथकांना मतदानकेंद्रांवर रवाना करण्यात आले.

सखी मतदान केंद्राची निर्मिती
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा विधानसभा क्षेत्रात 9 मतदान केंद्रांवर महिलाराज राहणार आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबध्दतेचा भाग म्हणून या लोकसभा निवडणूकीसाठी महिलांनी चालविलेले मतदान केंद्र असणार आहे. महिलांचा सहभाग असलेल्या या केंद्राला सखी मतदान केंद्र असे म्हटले जाणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी अकोले विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 128 अकोले अगस्ती विद्यालय अकोले, मतदान केंद्र क्र. 129 अकोले अगस्ती विद्यालय अकोले, संगमनेर मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 155 पी. जे. आंबरे पाटील कन्या विद्यालय संगमनेर, शिर्डी मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 90 शारदा विद्या मंदिर राहाता, मतदान केंद्र क्र. 60 जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी, कोपरगाव मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 100 नवीन म. अ. कार्यालय कोपरगाव, मतदान केंद्र क्र. 128 डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव, श्रीरामपूर मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 115 डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर , नेवासा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 49 सुंदरबाई गांधी कन्या विद्यालय नेवासा खुर्द आदी केंद्राचा समावेश आहे.

174 मतदान केंद्रावरुन होणार मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टिंग
शिर्डी लोकसभा निवडणुकीत लाइव्ह वेबकास्टिंगसाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात 174 मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान केंद्राचा परिसर इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली येणार आहे. त्यानुसार ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. मतदान केंद्र परिसरातील सर्व हालचाली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून पाहता येणार आहेत. 174 मतदान केंद्रावर लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. यामध्ये अकोले 31, संगमनेर 28, शिर्डी 30, कोपरगाव 27, श्रीरामपूर 31, नेवासा 27 या मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
मतदान केंद्रावर सुविधा
निवडणूक आयोगाने यावर्षीच्या निवडणूका महिला व दिव्यांग सुलभ जाहीर केल्या असून दिव्यांगाना मतदान केंद्रात विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गरोदर महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी सहकार्य व प्राधान्य देण्यात येणार आहे.


Web Title: Voting for Shirdi Lok Sabha Constituency tomorrow: 15 lakh voters will vote
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.