Shirdi: lead by shivsena,only vikhe | शिर्डी : सेनेलाच आघाडी, विखेंचा बोलबाला
शिर्डी : सेनेलाच आघाडी, विखेंचा बोलबाला

दिलीप चोखर
शिर्डी :पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने देशात पुन्हा एकदा सत्ता मिळविली आहे. शिर्डीत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना यावेळी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांचे बळ मिळाल्याने पुन्हा एकदा शिर्डी मतदारसंघातून आघाडी मिळाली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांचेच सातत्याने वर्चस्व राहिले आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत इतर तालुक्याच्या तुलनेने शिर्डी विधानसभा क्षेत्रातून सर्वात कमी आठ ते नऊ हजाराचे मताधिक्य शिवसेनेला मिळाले होते. २०१९ या निवडणुकीत कोण माजी मारील? अशी संभ्रमावस्था असताना ऐनवेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे याचे चिरंजीव डॉ.सुजय विखे यांनी ऐनवेळेस काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला.
अहमदनगरसह शिर्डीची शिवसेनेची जागा निवडून आणण्याचा शब्द त्यांनी दिला. शेवटपर्यंत संभ्रमावस्था असताना शेवटच्या टप्प्यात शिर्डीत सेना उमेदवार लोखंडे यांना विखे यांचे पाठबळ मिळाले. यामुळे शिर्डीतून लोखंडे यांना ६२ हजार ८७१ मताधिक्य मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डीमधून संजय सुखधान यांना मैदानात उतरवले. त्याचा फटका काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांना बसला. त्यांनी शिर्डीत १३ हजार ६७७ मते घेतली. कांबळे यांना ४० हजार ८९० मते मिळाली. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना केवळ ४ हजार ४७७ मते मिळाली. त्यांचा शिर्डीत काहीही प्रभाव दिसला नाही. विखे यांनी सेनेला मदत केल्याने मताधिक्य वाढले आहे. विधानसभेचा याचा विखेंना फायदा होईल.

नगर, शिर्डीतील विजयाने विखेंची ताकद वाढली
शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे यांचा बालेकिल्ला आहे. यामुळे राजकीय पक्षांपेक्षा विखे यांचेच या मतदारसंघावर वर्चस्व आहे. ज्या पक्षात विखे तो पक्ष विजयी होतो असे या मतदारसंघाचे समीकरण आहे. या मतदारसंघात विखे यांचा मतदारसंघातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क आहे. शिवाय विखे पाटील यांनी अहमदनगर व शिर्डी या लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्याने त्यांची वैयक्तिक ताकद मतदारसंघात वाढल्याने याचा फायदा त्यांना विधानसभेलाही होणार हे नक्की.

की फॅक्टर काय ठरला?
विखे हे भाजपसोबत असल्याने कोणत्याही परिस्थितीत सेनेला मताधिक्य मिळविण्यासाठी विखे यांनी प्रयत्न केले.

भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा सेना-भाजपच्या मतांना फारसा धक्का पोहोचला नाही.

निळवंडे लाभक्षेत्रातील गावांनी लोखंडे यांना जोरदार साथ दिली. तेथे कांबळे यांचा प्रभाव जाणवला नाही.

 


Web Title: Shirdi: lead by shivsena,only vikhe
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.