"आमच्या पाठिंब्याशिवाय महापालिकेत कोणाचाही महापौर होऊ शकत नाही"- असदुद्दीन ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:59 IST2026-01-12T13:59:02+5:302026-01-12T13:59:02+5:30
भाजप बीजेपी आणि आरएसएसला मस्जिद, दर्गा, कब्रस्थानच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत.

"आमच्या पाठिंब्याशिवाय महापालिकेत कोणाचाही महापौर होऊ शकत नाही"- असदुद्दीन ओवैसी
अहिल्यानगर : महापालिकेत आमचा पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे. ज्याला पाहिजे त्यालाच सत्तेवर बसवू, ज्यांना पसंद करत नाहीत, त्यांना सत्तेपासून दूर ठेवू आमच्या पाठिंब्याशिवाय महापालिकेत कोणाचाही महापौर होऊ शकत नाही, असा दावा एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथे एआयएमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.
ओवैसी पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळून संविधानाच्या विरोधात वक्फ कायदा केला. कायद्याच्या माध्यमातून बीजेपी आणि आरएसएसला मस्जिद, दर्गा, कब्रस्थानच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत.
हे काळे कायदे बनल्यानंतर महाराष्ट्रात मोठी निवडणूक होत आहे. मतदानाच्या माध्यमातून दिल्ली सरकारला प्रतित्त्युर द्यायचे आहे की आम्ही मस्जिद, दर्गा, कब्रस्थानबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.
वक्फचा मालक अल्लाह असतो. तिथं कोणताही व्यक्ती मालक होऊ शकत नाही. हा कायदा हिंदू देवस्थानाला लागू होत नाही. केवळ मुस्लिमांच्या पवित्र ठिकाणांना लागू केला आहे. हा अन्याय आहे.
आसामचे मुख्यमंत्री म्हणाले हिजाब घातलेली महिला पंतप्रधान होऊ शकत नाही. त्यांना विचाराचे आहे, का होऊ शकत नाहीत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला पंतप्रधान होण्याचा अधिकार दिला आहे. पाकिस्तानमध्ये एकाच धर्माची व्यक्ती हे पद घेऊ शकते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्माय भारतीय नागरिकांना समान अधिकार दिला आहे, असे प्रतित्त्युर त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, सध्या जाणीवपूर्वक मुस्लिमांना हा बांग्लादेशी म्हणतात, जन्मप्रमाणपत्र मागतात, गरिबांना त्रास देतात. द्वेष पसरवणाऱ्या लोकांना याचे परिणाम भोगावे लागतील, अशी टीका ओवैसी यांनी केली.