Lok Sabha Election 2019: खरा चौकीदार कमी पगारात भरडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:24 IST2019-04-04T13:24:38+5:302019-04-04T13:24:41+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मै हूँ चौकीदार’ची धूम असली तरी अनेक ठिकाणी पोटासाठी रात्रंदिवस आटापिटा करणारे खरे चौकीदार मात्र अत्यल्प पगार, वाढती महागाई, कामाच्या अनियमित वेळा अशा समस्यांमध्ये भरडून निघाले आहेत.

Lok Sabha Election 2019: खरा चौकीदार कमी पगारात भरडला
योगेश गुंड
केडगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मै हूँ चौकीदार’ची धूम असली तरी अनेक ठिकाणी पोटासाठी रात्रंदिवस आटापिटा करणारे खरे चौकीदार मात्र अत्यल्प पगार, वाढती महागाई, कामाच्या अनियमित वेळा अशा समस्यांमध्ये भरडून निघाले आहेत.
राजकीय कार्यकर्ते, नेते स्वत:ला चौकीदार म्हणवून घेत असताना चौकीदाराचे खरेखुरे काम करणाऱ्यांची दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र लढाई सुरू आहे. वाढती महागाई, कामाचे जादा तास, त्या तुलनेत मिळणारे तुटपुंजे वेतन यात खरा-खुरा चौकीदार पुरता भरडला आहे. ‘मै हूँ चौकीदार’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील पक्षाचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी संवाद साधला. निवडणुकीच्या प्रचारात चौकीदाराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नावापुढे ‘मै भी चौकीदार’ असे प्रोफाईल-स्टेटस् ठेवले आहे. मात्र खऱ्या चौकीदारांचा दोन वेळच्या जेवणाचा संघर्ष विदारक आहे.
‘लोकमत’ने चौकीदाराचे काम करणाºया काही जणांशी संवाद साधला. दुसऱ्यांचे जीवधन सुरक्षित करण्यासाठी दिवस रात्र कष्ट करणाºया या चौकीदारांचे आर्थिक जीवन मात्र असुरक्षित आहे. वाढती महागाई, तुटपुंज्या पगारावर चौकीदाराचे काम करणाºयांना आता न परवडणारे झाले आहे. त्यात कधी रात्र पाळी तर कधी दिवस पाळी अशा त्यांच्या कामाच्या अनियमित वेळा असल्याने आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या या चौकीदार नाऊमेदपणे जीवन कंठत आहेत.
रात्री सुरक्षेचा भार वाहणारे चौकीदार तर मोठ्या आर्थिक संकटात आहेत. रात्रभर फिरून चौकीदारी करायची. मात्र महिन्यातून एकदा लोकांच्या घरी काही पैसे मागण्यासाठी गेले तर वीस वर्षांपूर्वी मिळणारी १० रूपयांची नोट आता इतक्या वर्षानंतरही १० रूपयांचीच नोट चौकीदारांच्या हातात टेकविली जाते. हे काम परवडत नाही म्हणून अनेकांनी चौकीदारी सोडून चायनीज गाड्या, हॉटेलमध्ये वेटर असे काम सुरू केले आहे.
आमच्या गरिबांच्या खात्यात पैसे येणार होते ते का आले नाही हे कळले नाही. रात्रभर जागून आम्ही चौकीदारी करतो, पण काही लोक पैसे देतात, काही देत नाहीत. हे काम काहीच परवडत नाही. दोन वेळची पोटाची खळगी भरणे कधी कधी मुश्कील होते. महागाई वाढली तरी प्रत्येक घरातून फक्त १० रूपये देतात. यात कसे भागवायचे? - मनबहादूर बसनेत, केडगाव.
गेल्या २१ वर्षांपासून मी केडगावमध्ये चौकीदारी करतो. महिन्याला मी गावाला कसेबसे ५ हजार रूपये पाठवितो. रात्रीचे चौकीदारीचे काम करूनही लोक हवे तसे पैसे देत नाहीत. निम्मे लोक तर पैसे देत नाहीत. अशा वेळी कुटुंबाला पैसे पाठवून हातात काहीच उरत नाही. - बेलधर क्षत्री, केडगाव.
२५ वर्षांपासून चौकीदारीचे काम करतो. हे काम खूप कष्टाचे व डोळ्यात तेल घालून करीत असतो. मात्र वाढत्या महागाईच्या काळात यातून जास्त पैसे मिळत नाहीत. -राजा गोविंद झा, केडगाव.