नागरिक कायद्याच्या विरोधातील बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 18:17 IST2020-01-29T18:16:02+5:302020-01-29T18:17:13+5:30
सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्याठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि.२९) बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नागरिक कायद्याच्या विरोधातील बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद
अहमदनगर : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्याठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि.२९) बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नगरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नगर शहरातील काही भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी सकाळी ११ जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्याच ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. या बंदच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. बंद दरम्यन पोलिसांशी किरकोळ बाचाबाची झाल्याने एका आंदोलनकर्त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. एनआरसी, सीएए हटाओ,संविधान बचाओ, देश बचाओ या घोषणांनी परिसर दणाणला होता.
आंदोलनात अशोक गायकवाड, हाजी शौकत तांबोळी, राजेंद्र करंदीकर, मन्सूर शेख, उबेद शेख, राज मोहंमद नुरी, बाळासाहेब मिसाळ, मौलाना खलील नदवी, मौलाना अबुल सालेम, आकाश जाधव, अविनाश देशमुख, हाजी शौकत तांबोळी आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील माळीवाडा, पंचपीर चावडी, तख्ती दरवाजा चौक, माणिक चौक, कापड बाजार, मोची गल्ली, घासगल्ली, सर्जेपुरा, लालटाकी, मुकुंदनगर, पीरशहा खुंट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, भिंगार परिसरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. इतर ठिकाणी संमिश्र व अंशत: प्रतिसाद मिळाला.