अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बोगस कार्ड; काही उमेदवारांनी ताब्यात घेतली कार्ड
By सुदाम देशमुख | Updated: January 15, 2026 16:26 IST2026-01-15T16:21:23+5:302026-01-15T16:26:34+5:30
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये काही मतदारांची बोगस मतदान कार्ड तयार करण्यात आली. या कार्डचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान घडवून आणले जात असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवारांनी केला आहे.

अहिल्यानगरमध्ये मतदानासाठी बोगस कार्ड; काही उमेदवारांनी ताब्यात घेतली कार्ड
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये काही मतदारांची बोगस मतदान कार्ड तयार करण्यात आली. या कार्डचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान घडवून आणले जात असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवारांनी केला आहे.
अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील आनंद विद्यालय या मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. शिंदे सेनेचे उमेदवार चंद्रकांत उर्फ काका शेळके, संगीता खरमाळे, चेतन क्षीरसागर, वाखुरे, अपक्ष उमेदवार जयंत येलुलकर यांनी ही बाब उघडकीस आणली. 300 ते 400 बोगस मतदान कार्ड तयार करून ते काही तरुणांच्या हातात दिले जात असून त्याद्वारे हे मतदान घडवून आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे उमेदवार जयंत येलूलकर, काका शेळके, संगीता खरमाळे यांनी "लोकमत"ला सांगितले.
बोगस कसे?
ग्रामीण भागातील काही नागरिकांचे मतदान कार्ड शहरांमध्ये तयार करण्यात आली. त्यांच्या नावाची मतदार कार्ड शहरातील काही तरुणांच्या हाती देऊन हे मतदान घडवून आणले जात असल्याचे यावरून दिसून आले. ज्यांच्या नावे कार्ड आहे, ते मतदार प्रत्यक्षात उपस्थित नव्हते. मात्र दुसरेच कोणीतरी हे मतदान करत असल्याचा हा प्रकार या मतदान केंद्रावर घडून आला.