"युती झाल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाला, नाराजांना महामंडळ व इतर ठिकाणी संधी"; प्रदेशाध्यक्षांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:10 IST2026-01-06T13:53:37+5:302026-01-06T14:10:17+5:30
काही नेते, पदाधिकाऱ्यांना महामंडळावरदेखील संधी दिली जाईल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

"युती झाल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाला, नाराजांना महामंडळ व इतर ठिकाणी संधी"; प्रदेशाध्यक्षांची कबुली
Ravindra Chavan: अहिल्यानगर महापालिकेत युती झाल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यातील काहींना महापालिकेत वेगळ्या पदांवर संधी दिली जाईल. तसेच काही नेते, पदाधिकाऱ्यांना महामंडळावरदेखील संधी दिली जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे सांगितले.
राष्ट्रवादी-भाजप युतीच्या प्रचारफेरीसाठी चव्हाण अहिल्यानगरला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार संग्राम जगताप, विक्रमसिंह पाचपुते आदी उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी आणि भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. कार्यकर्ते व पदाधिकारी आपापल्या भागात वर्षानुवर्षे काम करत असतात. पक्षाची उमेदवारी मिळावी, ही त्यांची मागणी रास्तच आहे. परंतु, युती करण्याचा निर्णय होतो, त्यावेळी कार्यकर्त्यांवर अन्याय होतो.
राज्यभरातच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांची समजूत काढली जात आहे. त्यांना महापालिकेत इतर ठिकाणी संधी देण्यात येईल. महामंडळांच्या नियुक्त्याही अद्याप झालेल्या नाहीत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सभेनंतर विखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पक्षात जुने व नवीन असा वाद नाही. मी स्वतः नाराजांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
महायुतीचा धर्म फक्त भाजपनेच पाळावा का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी छेडले असता चव्हाण म्हणाले, पवार काय म्हणाले, ते तपासा. त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून मी बोललो होतो. महायुतीचा धर्म भाजपनेच पाळावा, असे नाही. त्यांनी तसे बोलू नये, आम्हीही बोलणार नाही, असे ते म्हणाले.