पक्षाकडून शब्द मिळाला, अर्ज भरले, पण एबी फॉर्म कुणाला? सस्पेन्स आज संपणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:16 IST2025-12-30T11:16:53+5:302025-12-30T11:16:53+5:30
दिवसभरात १६० जणांनी भरले अर्ज उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, होणार मोठी गर्दी

पक्षाकडून शब्द मिळाला, अर्ज भरले, पण एबी फॉर्म कुणाला? सस्पेन्स आज संपणार
अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी दिवसभरात विविध पक्षांकडून तब्बल १६० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. एकाच पक्षाकडून एकाच प्रभागातील एका जागेसाठी दोन ते तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज मात्र पक्षांकडून ज्यांना एबी फॉर्म मिळणार, तोच अधिकृत उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे आतापर्यंत सर्वपक्षीयांनी गुपित ठेवलेली उमेदवारांची यादी समोर येऊन सस्पेन्स संपणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार हा अंतिम दिवस असल्याने सोमवारी दिवसभर सहा निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सावेडी येथे तहसील व प्रभाग समिती कार्यालय १ परिसरात तीन निवडणूक कार्यालये असल्याने येथे दुपारी तीनपर्यंत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ होती. एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक ते दीड तासांचा अवधी लागत होता. त्यामुळे उशिरा आलेल्यांना प्रतीक्षा करावी लागत होती.
दिवसभरात भाजप, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, बसप, एमआयएम, रिपाइं तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले. बहुतांशी जणांनी पक्षासह अपक्षही उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत गेल्या पाच दिवसांत २०० पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज शेवटचा दिवस असल्याने सर्वपक्षीयांकडून अर्ज दाखल होणार आहेत.
उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन
बहुतांशी उमेदवारांनी प्रभागात मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. काही जणांनी देवदर्शन घेत, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन समर्थकांसह निवडणूक कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे सावेडी, जुनी महापालिका येथील निवडणूक कार्यालयाबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. अर्ज भरतेवेळी गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दाखला, स्वाक्षरी राहिली... धावपळ उडाली
बहुतांशी उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज भरले होते. मात्र, ४५ पानांचा अर्ज भरताना अनेकांचा मोठा गोंधळ उडाला. काहींचा एखादा दाखला बाकी होता, तर कुणाची एका ठिकाणी स्वाक्षरी करणे बाकी होते. अर्ज तपासणीदरम्यान उमेदवारांना याची पूर्तता करावी लागली. त्यामुळे एका उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी एक ते दीड तासाचा अवधी लागत होता.
एक घरातून २ ते ३ अर्ज
ऐनवेळी काही कारणास्तव अर्ज बाद झाला तर अडचण नको म्हणून बहुतांशी उमेदवारांनी स्वतः सह पत्नी, मुलगा, आई यासह घरातील इतर सदस्यांचेही अर्ज भरले आहेत.