Rain Update कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळीव पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बसरण्याचा तसेच त्यासोबतच ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे वीट व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह १० जिल्ह्यात आज, पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वळीव पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज या पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचनाही दिल्या आहेत.
उकाड्याने हैराण
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी ३७.४ अंश डिग्री सेल्सिअस इतके कमाल आणि २४.७ अंश डिग्री सेल्सिअस इतके किमान तापमान हवामान खात्याने नोंदवले आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. सोमवारी रात्री काही भागात हलक्या सरी कोसळल्या.
गारपिटीची शक्यता
आज, मंगळवार आणि उद्या बुधवार या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. सोमवार दि. ७ एप्रिलपर्यंत ढगाळ तसेच गडगडाटाचे वातावरण जरी असले तरी या वातावरणाचा शेती पीक काढणीच्या सध्याच्या काळात, परिणामकारक प्रभाव मात्र १ ते ४ एप्रिल पर्यंत अधिक वाढण्याची शक्यता निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा: आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर