सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांसमोर महापुराचे संकट पुन्हा उभे राहिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातीलधरणांसह अलमट्टी धरणातीलपाणीसाठा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
अलमट्टी धरणात सोमवारी ९६ टीएमसीपर्यंत पाणीसाठा झाला असून, धरण ७८ टक्के भरले आहे. कोयना ७१ टक्के तर वारणा ८१ टक्के भरल्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे.
जुलै, ऑगस्टपर्यंत कोणत्याही धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असू नये, असा केंद्रीय जल आयोगाचा नियम आहे. पण या नियमाचे पालन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाटबंधारे विभाग करत नसल्याचे धरणातील पाणीसाठ्यावरून दिसून येत आहे.
धरणातील सध्याची पाणीसाठ्याची आकडेवारी काही प्रमाणात नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारीच आहे. कोयना धरण ७३.३० टीएमसी म्हणजे ७१ टक्के भरले असून, वारणा धरण २७.८८ टीएमसी म्हणजे ८१ टक्के भरले आहे.
अलमट्टी धरणात सोमवारी दुपारी ९६ टीएमसी पाणीसाठा असून, धरण ७८ टक्के भरले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारी केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार नाही, असा आरोप सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी केला आहे.
पावसाचा जोर वाढल्यावर काय करणार?
- अलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ १०० टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे.
- वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ती आताच त्यांनी गाठली आहे.
- याबद्दल महाराष्ट्राच्या जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. पण प्रशासन आणि राज्यकर्ते त्याकडे लक्ष देत नाहीत.
- याबद्दल राज्य शासन आणि केंद्रीय जल आयोगाकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिली.
धरण - क्षमता (टीएमसी) - साठा
राधानगरी - ८.३४ - ६.८७
तुळशी - ३.४१ - २.७७
वारणा - ३४.३९ - २७.८८
दूधगंगा - २५.३९ - १७.७८
कासारी - २.७७ - १.९७
कडवी - २.५३ - २.३०
कुंभी - २.७१ - २.०४
पाटगाव - ३.७१६ - ३.३६
कोयना - १०५.२५ - ७४.३०
धोम - १३.५० - १०.१२
कण्हेर - १०.१० - ७.६८
उरमोडी - ९.९६ - ७.२६
तारळी - ५.८५ - ४.९५
बलकवडी - ४.०८ - २.३०
अधिक वाचा: शेत रस्त्यांचे वाद मिटणार; आता रस्त्यांची कायदेशीररीत्या सातबाऱ्यावर 'या' ठिकाणी होणार नोंद