सोलापूर : उजनी धरणातीलपाणी कुरुल शाखेतून बुधवारी सायंकाळी सीना नदीत सोडण्यात आले. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी केलेल्या धरणे आंदोलनाला अखेर यश आले.
जलसंपदा विभागाने यापूर्वी १२ मे रोजी सीना नदीतपाणी सोडण्यात येईल, असे लेखी पत्र नदीकाठच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिले होते.
मात्र, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सु.स. खांडेकर यांनी उजनी धरणातील पाणी पातळी घटल्याने सीना नदीत पाणी सोडण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती.
ठरलेल्या वेळेत पाणी न सोडल्याने बुधवारी सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा सिंचन भवनसमोर धरणे आंदोलन केले. आमदार सुभाष देशमुख हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी थेट बोलणी करून आ. देशमुख यांनी सीना नदीत पाणी सोडण्याची विनंती केली होती.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासंदर्भात अधीक्षक अभियंता सु. स. खांडेकर यांच्याशी चर्चा करून पाणी सोडण्याबाबत मध्यस्थी केली.
उजनी धरणाच्या पाणीपातळीचा अहवाल अधीक्षक अभियंत्यांनी जलसंपदामंत्र्याकडे तातडीने सादर केला, त्यानंतर कुरुल कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.
बुधवारी सकाळी ११ वाजता कुरुल शाखा कालव्यातून महादेव ओढ्याच्या माध्यमातून पाणी सोडले जाणार होते, काही तांत्रिक अडचणीमुळे बुधवारी सायंकाळी ६ वाजता पाणी सोडण्यात आले.
तिऱ्हे परिसरातील शेतकऱ्यांनी महादेव ओढ्यात पाणी सोडण्याचे प्रत्यक्ष पाहिले त्यानंतरच सुटकेचा निःश्वास सोडला. पाणी सोडल्याने सीना काठावरील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
उजनी धरणातून सायंकाळी पाणी सोडले जात आहे. सध्या धरणाची पाणी पातळी वजा २२.९६ टक्के असून येत्या २५ मेपर्यंत सीना नदीतील पाण्याचा प्रवाह सुरू राहील. धरणापासून १२६ किमीपर्यंतच्या कालव्यानजीकचा वीजपुरवठा केवळ चार तास करण्यात आला आहे. - संभाजी माने, अभियंता, जलसंपदा विभाग, सोलापूर
अधिक वाचा: राज्यातील या प्रमुख सहा धरणांचा पाणीसाठा आता वाढणार, शासन आखतंय हे नवे धोरण