पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील गावांत गावरान कांदा लागवड आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतीला पाण्याची आवश्यकता आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी कुकडी कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हिवाळी अधिवेशनात केली.
त्यावर २० डिसेंबरपासून रब्बी हंगामातील पिकांसाठी कुकडीचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी दिली.
दाते यांच्या मागणीची दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्याशी चर्चा करत त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले.
कुकडीचे आवर्तन १५ डिसेंबर रोजी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, कालवा दुरुस्तीची कामे सुरू असल्याने आवर्तन सोडण्यात अडचण निर्माण झाली.
ही दुरुस्तीची कामे २० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यामुळे २० ते २५ डिसेंबर दरम्यान आवर्तन सोडण्याची ग्वाही अहिरराव यांनी दिली.
सध्या पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू आहे. त्यासाठी सातत्याने पाण्याची गरज असून, रब्बी हंगामातील पिकांनाही पाण्याची गरज आहे.
त्यानुसार, कुकडीचे आवर्तन २० ते २५ डिसेंबरपासून सुटणार असल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार असल्याचे दाते यांनी सांगितले.
अधिक वाचा: चालू गळीत हंगामासाठी माळेगाव साखर कारखान्याची पहिली उचल जाहीर; कसा दिला दर?
