भरत निगडे
नीरा: नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात यावर्षी सरासरी इतका पाऊस पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने व परतीचा पावसानेही दमदार हजेरी लावल्याने धरणे ओसंडून वाहत होती.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नीरा खोऱ्यातील चार धरणांत गतवर्षापेक्षा सरासरी १४ टक्क्यांपेक्षा पाणीसाठा अधिकचा असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चारही धरणात एकूण ३६ हजार ९०१ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ७६.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
गतवर्षी ३० हजार ४०६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ६२.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यावर्षी मे महिन्यापर्यंत दोन्ही कालव्यातून नियमित विसर्ग सोडण्यात येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
यावर्षी नीरा खोऱ्यातील या चार धरणात आज, बुधवारी (दि. २२) ७६.३५ टक्के पाणीसाठा आहे. या पाण्याचा उपयोग रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना फायदेशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे यावर्षी नीरा हावा व उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना उन्हाळी आवर्तन नियमित मिळणार असल्याची माहिती समजते. नीरा खोऱ्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती गतवर्षांपेक्षा आकडेवारीवरून समाधानकारक असल्याचे समोर येत आहे.
रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सुरू
नीरा खोऱ्यातील पाणीसाठ्यावर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरससह इतर भागातील शेतकऱ्यांना वरदान असलेल्या वीर धरणावरील दोन्ही कालव्यांतून रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सुरू झाले आहे.
तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ विसर्ग
२०२३ च्या पावसाळी हंगामात नीरा खोऱ्यात सरासरीपेक्षा २० टक्के पाऊस कमी झाला होता. त्यामुळे धरणे शंभर टक्के भरलीच नव्हती. परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला नव्हता. आता या वर्षी २०२३ च्या पावसाळी हंगामात सरासरी इतका तर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती. सर्व धरणांतून तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ विसर्ग सुरू होता.