टेंभुर्णी: उजनीतून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग रविवारी सकाळी बंद करण्यात आला होता. सायंकाळी १० हजार क्युसेक पुन्हा सुरु करण्यात आला आहे.
८२ दिवस धरणातून विसर्ग सुरू होता. यामधून तब्बल २०० टीएमसी अतिरिक्त पाणी भीमेत सोडून देण्यात आले. तर वीजनिर्मितीसाठी सोडलेल्या पाण्यातून आत्तापर्यंत २ कोटी ५६ लाख ३२ हजार युनिट वीजनिर्मितीधरणाचा पाण्यापासून झाली आहे.
गेल्या चार महिन्यांत ८९ दिवसांपासून हा प्रकल्प कार्यान्वित आहे. सध्या वीजनिर्मिती सुरू असून, त्यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाणी उजनीतून सोडण्यात येत आहे.
सध्या धरणाची पाणीपातळी १०० टक्के असून, सध्या दौंड येथून ८ हजार ९८९ क्युसेक विसर्ग धरणात सुरू आहे. उजनीची क्षमता १११ टक्के असून उजनी पूर्ण क्षमतेने भरले जाणार आहे.
१२३ टीएमसी क्षमता असलेल्या धरणात सध्या ११७.२३ टीएमसी एकूण पाणीसाठा असून, ५३.५७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीकाठचा गावात तीन वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती.
यावर्षी भीमा खोऱ्यात व उजनी पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीकाठावरील पूरस्थिती टाळण्यासाठी २० जूनपासून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. धरणातून तीन वेळा एक लाखापेक्षा जास्त विसर्ग सोडण्यात आला होता.
पावसाची नोंद
मे महिन्यापासून एकूण २५७ मिलिमीटर पावसाची नोंद उजनी पाणलोट क्षेत्रात झाली तर १ जूनपासून ५ ऑक्टोबरपर्यंत ७०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा जास्त आहे. पावसाळा १५ ऑक्टोबरपर्यंत धरला जातो.
दोन कोटी ५६ लाख ३२ हजार युनिट वीजनिर्मिती
◼️ उजनी वीजनिर्मिती प्रकल्प हा १२ मेगावॅट क्षमतेचा असून, दर तासाला १२ हजार युनिट वीजनिर्मिती यामधून होते.
◼️ गतवर्षी ११६ दिवस हा प्रकल्प कार्यान्वित होता.
◼️ सध्या २० जूनपासून वीजनिर्मिती सुरू असून, ८९ दिवस हा प्रकल्प कार्यान्वित आहे.
◼️ यामधून अभ्यासाअंती एकूण २ कोटी ५६ लाख ३२ हजार युनिट वीजनिर्मिती झाली आहे. ती आणखी काही दिवस सुरू राहणार आहे.
दौंड येथील विसर्ग कायम
उजनीतून भीमेत २०० टीएमसी अतिरिक्त पाणी सोडले, गतवर्षी १५६ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडून द्यावे लागले होते. २५ मेपासून धरणात मिसळणारा दौंड येथील विसर्ग मात्र कायम आहे.
अधिक वाचा: तुमच्या ग्रामपंचायतीनं कुठं अन् किती पैसा खर्च केला? सर्व हिशेब पहा आता तुमच्या मोबाईलवर