विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातून तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तिथे वाघला येथे प्रकल्प उभारण्याची मागणी केली.
मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही मागणी फेटाळून लावत पाणी देण्यास स्पष्टपणे नकार देतानाच मन्याडचे पाणी कुठेही अडवले जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य व वाढती पाण्याची तूट असणाऱ्या मन्याड परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आमदार बोरनारे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले की, वैजापूर तालुक्यातील वाकला परिसरात तापी खोऱ्याकडे म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पात जे पाणी वाहून जातं, त्यावरती चांदेश्वरी हा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पस्थळी पाणी उपलब्धता २.३ दशलक्ष घनमीटर आहे.
प्रस्तावावर मन्याडचं पाणी उपलब्ध नसल्याचं उत्तर
२०१३ला राज्य जल आराखडा तयार झाला. परत २०१८ला त्याचे पुनर्नियोजन झालं आणि या दोन्ही आराखड्यामध्ये चांदेश्वरी वाकला (ता. वैजापूर) याठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रास्तावित करण्यात आलं. जेव्हा हा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या जलसंपदा कार्यालयाकडून नाशिककडे पाठवला गेला, तेव्हा मात्र त्या ठिकाणी उत्तर असं आलं की हा प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पांतर्गत येत असल्याने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही.
राज्य जल आराखड्यात असताना पाणी का नाही?
• जर राज्य जल आराखड्यामध्ये या ठिकाणी पाणी उपलब्ध असेल, तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या या प्रस्तावाला पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे, असे मत आमदार बोरनारे यांनी लक्षवेधी सूचनेत व्यक्त केले.
• मन्याड धरणात येणारे हे पाणी वैजापूर तालुक्यासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार बोरनारे यांनी विधानसभेत केली. या प्रश्नावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सविस्तर उत्तर दिलं.
अतीतुटीचा प्रकल्प; पाणी देण्याचा प्रश्नच नाही
• या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्प हा आधीच १३.९ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या अतीतुटीचा प्रकल्प आहे.
• तसा अहवालदेखील तापी पाटबंधारे महामंडळाने दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पात वैजापूर तालुक्यातील येणारे पाणी देता येणारच नाही, असे मंत्री महाजन यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले. मन्याड धरणावर अनेक शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असून त्यांना जेमतेम पाणी पुरत असताना ते अडवल्यास शेतकऱ्यांची शेती धोक्यात येईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले
• अतितुटीच्या मन्याड प्रकल्पात गिरणा धरणाचे पाणी नदीजोड कालव्याद्वारे टाकण्याची यापूर्वीच मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली असून त्यादृष्टीने सर्वेक्षणदेखील झालं आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील २२ गावांच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.