सध्या विदर्भात पावसाने कहर केला असून, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांच्यापाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या राज्यातील धरणसाठा सुमारे ५९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
या पाणीसाठ्यामुळे पुढील काही महिन्यांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या वर्षी राज्यात हाच साठा २७ टक्के होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा ३२ टक्क्यांनी जास्त आहे.
मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने येथील साठा केवळ १० टक्के आहे, तर कोकणातील धरणांत ७४ टक्के पाणी जमा झाले आहे.
राज्याच्या काही भागांत मे महिन्यापासून अवकाळीने तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने हजेरी लावली. त्यानंतर जुलैच्या पहिल्या टप्प्यातदेखील पावसाची बॅटिंग जोरात सुरू आहे. त्यामुळे नेहमीच्या वेळेपूर्वीच धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात सध्याचा पाणीसाठा ५९ टक्क्यांवर गेला आहे. त्यातही मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची हजेरी सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळेच या भागात धरणामध्ये पाणीसाठा इतर विभागातील धरणांपेक्षा जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
राज्यातील सर्वच विभागांत असलेल्या धरणामध्ये सध्या एकूण ५८.८७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा २७.३८ टक्के होता. यंदा हा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत ३१.४८ टक्क्यांनी जास्त आहे.
राज्यात जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत मोठी, मध्यम आणि लहान अशी मिळून २ हजार ९९७ धरणे आहेत. जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सद्यःस्थितीत राज्यातील संभाजीनगर विभागात सर्वांत कमी १०.३३ टक्के पाणीसाठा आहे.
तर सर्वाधिक साठा कोकणात सुमारे ७५ टक्के इतका झाला आहे. विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणात सर्वांत पाऊस जास्त बरसला. त्यामुळे या भागातील बहुतेक सर्वच धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
राज्यातील जलसाठा (टक्के)
विभाग | धरण | आजचा साठा | गतवर्षी साठा |
नागपूर | ३८३ | ४८.४० | ३७.८१ |
अमरावती | २६१ | ४७.४९ | ४०.८५ |
संभाजीनगर | ९२० | ४३.४६ | १०.३३ |
नाशिक | ५३७ | ५७.४५ | २४.४२ |
पुणे | ७२० | ६८.९६ | २५.२७ |
कोकण | १७३ | ७४.४९ | ४७.४३ |
एकूण | २९९४ | ५८.८६ | २७.३८ |
अधिक वाचा: महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य; पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय