भरत निगडे
नीरा देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२४ मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने व परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे चारही धरणे शंभर टक्के भरून दोन आठवडाभर वाहिली.
आता या नीरा खोऱ्यातील चार धरणांत बुधवार (दि.२) अखेर गतवर्षापेक्षा सरासरी २० टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या मुबलक पाणीसाठ्यामुळे सिंचन क्षेत्रातील शेतकरी आशावादी आहेत.
बुधवारी (दि.२) नीरा खोऱ्यातील चार धरणांत ४३.७४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी आजच्या दिवशी ३४.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. दरम्यान, वीर धरणात ५२.४२ टक्के पाणीसाठा असल्याने दोन्ही कालव्यांतून मुबलक प्रमाणात सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जात आहे.
नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेकने तर नीरा उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत कालव्यातून आवर्तन सुरू राहील, अशी आशा आहे.
यावर्षी नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी व वीर ही धरणे १०० टक्क्यांच्या वर भरली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असला, तरी यावर्षी उन्हाळादेखील कडक आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, दुपारी उन्हाची प्रचंड दाहकता जाणवत आहे.
आगामी महिन्यांमध्ये तर उष्णतेच्या लाटा येणार असल्याचे हवामान अभ्यासक सांगत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणात मुबलक पाणीसाठा झाला होता.
त्यामुळे शेती सिंचनाला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली तर रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा व उन्हाळी सोयाबीन लागवडदेखील शेतकऱ्यांना करता आली.
भाटघरमध्ये ४४.४७ टक्के
भाटघर धरणामध्ये १०,४५२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ४४.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ६,७०५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात २८.५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. वीर धरणामध्ये ४,९३३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच ५२.४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ४,४५६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी अर्थात ४७.३६ टक्के पाणी उपलब्ध होता.
नीरा-देवघर धरणात ३३.३२ टक्के
४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चारही धरणांत एकूण २१ हजार १४० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ४३.७४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी १६ हजार ५४३ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ३४.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे गतवर्षी जून महिन्यापर्यंत दोन्ही कालव्यांतून नियमित विसर्ग सोडण्यात येईल. बुधवार, २ एप्रिलअखेर नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणात ३,९०८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ३३.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ३,८६४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ३२.९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
गुंजवणी धरणात ५०.०५ टक्के
गुंजवणी धरणामध्ये १,८४७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ५०.०५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी १,५१८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ४१.१४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती गतवर्षापेक्षा आकडेवारीवरून समाधानकारक असल्याचे जाणवत आहे.
वीर धरणात ५२.४२ टक्के
वीर धरणात ५२.४२ टक्के पाणीसाठा असल्याने दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे.
अधिक वाचा: Uajni Dam Water : २० एप्रिलनंतर उजनी मृत साठ्यात जाण्याची शक्यता; धरणात उरला किती पाणीसाठा?