राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला तसा इशारा देण्यात आला आहे.
त्यानुसार मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तर कोकणात १७ एप्रिलपर्यंत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.
उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ओआरएस घ्यावे, सैल कपडे वापरावेत. याशिवाय घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सावलीत विश्रांती घ्यावी.
ज्येष्ठ, मुलांची काळजी घ्यावी. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान टाळावे. लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राने केले.
राज्यात हलक्या पावसाची सर, उष्णतेचीही बसणार झळ
◼️ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १८ ते २१ एप्रिलदरम्यान ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
◼️ १६ ते १८ एप्रिलदरम्यान राज्यात कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. मात्र, १९ ते २२ एप्रिलदरम्यान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.
अधिक वाचा: पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई जाहीर; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
