नितीन चौधरी
पुणे : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासाठी पीकविमा योजनेतून मदत जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे.
यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांची नुकसानभरपाई येत्या काही दिवसांत मिळेल. त्यामुळे या रकमेत आणखी वाढ होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सर्वाधिक ८१३ कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सबंध खरिपात तब्बल ९८ लाख ४३ हजार ८२३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते.
पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेतून हेक्टरी १७ हजार रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पीकविमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगांवर आधारित आहे.
त्यानुसार राज्यातील सुमारे १२ हजार महसूल मंडळांमधील पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आली. शेतकऱ्यांचे आलेले उत्पादन कमी असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे.
या १२ हजार महसूल मंडळांपैकी सुमारे साडेसात हजार मंडळांची नुकसानभरपाईची माहिती अंतिम झाली. त्याला केंद्र सरकारने तसेच विमा कंपन्यांनी सहमती दर्शविल्यानंतर नुकसानभरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारीअखेरपर्यंत असल्याने या उर्वरित पाच हजार मंडळांची माहिती येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.
नुकसानभरपाईची मदत जिल्हानिहाय (आकडे लाखांत)
अहिल्यानगर - ११,८३५.०४
नाशिक - ८७८.७८
चंद्रपूर - २६०.५०
सोलापूर - ६८४.०६
जळगाव - १०६.९५
सातारा - ३६२.१८
परभणी - ६,३७८.०२
वर्धा - ९६१.८२
नागपूर - १९४.७०
जालना - २०९.३३
गोंदिया - ३,१०१.७७
कोल्हापूर - ०.२७
ठाणे - १,७९३.८२
रत्नागिरी - ७.०८
सिंधुदुर्ग - २३.२९
नांदेड - ८१,३३७.९७
संभाजीनगर - २५.०१
भंडारा - ४३३.६८
पालघर - १,५३४.७७
रायगड - १०६.३४
वाशिम - १०९.००
बुलढाणा - ५६४.९८
सांगली - १२७.१४
नंदुरबार - २०९.४१
हिंगोली - ९,८९५.५६
अकोला - १५८.९४
धुळे - १०३.१५
पुणे - १००.०६
अमरावती - २५०.२०
गडचिरोली - २२४.३६
एकूण - १,२१,९७८.१८
३१ जिल्ह्यांत मदत
◼️ राज्यात साडेसात हजार मंडळांमधील नुकसानभरपाई निश्चित झाली आहे.
◼️ ३१ जिल्ह्यांतील ७८ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना १ हजार २१९ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
◼️ नुकसानभरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश आहे.
◼️ राज्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाखाली सुमारे ५८ लाख हेक्टर क्षेत्र आहे.
◼️ त्यातील सुमारे ३५ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरविण्यात आला होता.
अधिक वाचा: दहा किलोवॅटपेक्षा अधिक सौर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना झटका; लागू होणार आता 'हे' चार्जेस
