पुणे व सातारा जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या नीरा नदी खोऱ्यातील धरणसाखळीत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरण या चार धरणांत तब्बल ४९.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, वीर धरणात निम्म्याहून अधिक साठा असल्याने जूनच्या आठवड्यापर्यंत दुसऱ्या सिंचन सुरळीत राहण्याची चिन्हे आहेत.
पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच साताऱ्यातील खंडाळा, फलटण आणि पुढे सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती या धरणांवर अवलंबून आहे. सध्या या चार धरणांत एकूण सुमारे २३.८८५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
मागील वर्षी याच कालावधीत हा साठा ४०.८२ टक्के (१९.७२७ टीएमसी) इतका होता. यंदा त्यात लक्षणीय वाढ झाल्याने खरीप हंगामासाठीही सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.
सोमवार (दि. ६) अखेर गुंजवणी धरणात ४४.२३ टक्के, भाटघरमध्ये ४९.४६ टक्के, नीरा देवघरमध्ये ४७.४४ टक्के, तर वीर धरणात ५३.८५ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, वीर धरणातील साठ्यामुळे नीरा डावा व उजवा कालवा पुढील तीन महिने प्रवाहित राहणार असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळण्याची हमी मिळाली आहे.
२०२५-२६ च्या पावसाळ्यात झालेल्या मुबलक पावसामुळे यंदा उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
परिणामी, शेतकऱ्यांनी रब्बी पिके, फळबागा तसेच चारा पिकांवर भर दिला असून, अनेकांनी चार पिकांची पद्धत अवलंबत उत्पन्न वाढवले आहे. हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे.
दरम्यान, वीर धरणातून सध्या शेतकऱ्यांच्या नीरा डाव्या कालव्यात ८२७ क्युसेक, तर उजव्या कालव्यात १,५५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे नदीकाठच्या व कालव्यालगतच्या सिंचनाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याची माहिती प्रशासनातील कर्मचारी संभाजी शेडगे यांनी दिली.
एकूणच, नीरा खोऱ्यातील मुबलक पाणीसाठ्यामुळे यंदाचा उन्हाळा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून, आगामी हंगामासाठीही आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक वाचा: लाईट बिल अजून कमी होणार, आता मिळणार डिस्काउंट; कोणत्या युनिट स्लॅबला किती रुपये डिस्काउंट?
