पंढरपूर : उजनी व वीर धरणांतून भीमा नदीत १ लाख १७ हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे पंढरपूर येथे मंगळवारी सायंकाळी ९० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
यामुळे कोल्हापूर पद्धतीचे ८ बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे.
त्यामुळे पंढरपूर येथे पाचव्यांदा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार दुपारनंतर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट करण्यात आल्यामुळे नागरिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
उजनी धरणातून १ लाख, तर वीर धरणातून १७ हजार क्युसेकचा विसर्ग सोमवारी करण्यात आला होता. यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीला पुन्हा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
हा विसर्ग सोमवारी रात्री पंढरपुरात दाखल झाला आहे. चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. तर जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
तसेच भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे विष्णूपद, गुरसाळे, पंढरपूर, मुंढेवाडी, कौठाळी, पिराची कुरोली, पुळूज, आव्हे हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
त्यामुळे या बंधाऱ्यांवरून होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. याबाबत प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नदीकाठच्या नागरिकांचे परिस्थितीनुसार स्थलांतर करण्यात येणार आहे. नागरिकांनी चंद्रभागा नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
विसर्ग घटल्याने तूर्त धोका टळला
दरम्यान, उजनी धरणातून करण्यात येणारा १ लाखाचा विसर्ग कमी करण्यात आला असून, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ५५ हजार क्युसेक, तर वीरमधून करण्यात येणारा १७ हजार क्युसेकचा विसर्ग कमी करून तो ७ हजार ८३७ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे पुराचा धोका टळला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर