दिलीप कुंभार
नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथील निवृत्त सहायक पोलिस फौजदार सुभाष कोळी यांनी ४० आर क्षेत्रावर सेलम या वाणाच्या जातीची लागवड केली.
केवळ नऊ महिन्यांत ४ लाख ५१ हजार रुपयांची देशी गाईच्या मल-मूत्रावर हळद पिकवून शेती कशी परवडते हे दाखवून दिले आहे.
सुभाष कोळी यांनी पोलिस सेवेत ३९ वर्षे सेवा करूनही मातीशी नाळ कधी सोडली नाही. कोळी हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती.
रासायनिक खतांपासून अलिप्त ठेवून देशी गाईच्या मल-मूत्रावर शेतीचा पोत कायम राखला आहे. शेणखतासाठी १० गुरेही पाळली आहेत. रासायनिक खतांचा वापर न करता किटकनाशक औषधांनाही दूर ठेवले आहे.
२५ मे २०२४ रोजी सुभाष कोळी यांनी आपल्या शेतात हळदीची लागण सरी पद्धतीने केली. लागणीपूर्वी शेतात ४० आर क्षेत्रावर १३ ट्रॅक्टरचे डबे शेणखत टाकले आहे.
हळदीच्या रोग नियंत्रणासाठी देशी गाईच्या मुत्राचा वापर करून आळवणीसाठी शेणाचा वापर केला आहे. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी हळद लागवडीपासून ९ महिने पूर्ण होताच काढणी केली असता, हळदीच्या एका बुंध्यास ८ ते ९ फण्या फुटल्या आहेत.
यासाठी सुभाष कोळी यांना त्यांच्या पत्नी चंद्रकला यांची भक्कम साथ मिळाली असून, मुले सचिन व महेश, तसेच सुना माधुरी व पूनम यांचीही मोलाची साथ मिळाल्याने त्यांनी अपेक्षित यश सहज संपादन केले आहे. ४० आर हळदीच्या क्षेत्रातून ३१ क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे.
मातीतूनही पिकवले सोने
हळद पीक अंतर्गत करपा नियंत्रणासाठी मक्याचीही लागवड करून यातूनही सुमारे १० हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे. याकरिता ठिबक सिंचनाचाही वापर करून कमी पाण्यातही हळद पिकविता येते हे सिद्ध करून दाखविले आहे. असे हे प्रयोगशील शेतकरी सुभाष कोळी यांनी आजच्या बेरोजगार तरुणांना नोकरीच्या मागे न लागता मातीतूनही सोने पिकविता येते, हे दाखवून दिले आहे.
अधिक वाचा: मुख्य पिकासोबत तसेच बांधावर कडधान्यांची लागवड कमवून देईल अधिकची रोकड