मागील भागामध्ये आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचे प्रकार व त्यासाठी लागणाऱ्या प्रमुख घटकांची आवश्यकता याविषयी माहिती घेतली. या भागांमध्ये आपण शेतकरी समुदायाला रेन वॉटर हार्वेस्टिंग मुळे होणारे प्रमुख फायदे जाणून घेणार आहोत.
रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे होणारे प्रमुख फायदे
१) शेतीसाठी पाण्याचा प्रमुख स्त्रोत म्हणजे विहीर होय. पडलेल्या पावसाचे पाणी बरेच वेळा जमिनीवरून वाहून जाते. आपल्या जमिनीमध्ये तितक्या प्रमाणात मुरत नाही. थोडक्यात, पडलेल्या प्रत्येक पावसाच्या थेंबाचा आपल्या भूजलातील पातळी वाढवण्यासाठी उपयोग होत नाही. म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे हे पाणी जलसिंचनाचा एक महत्त्वाचा स्त्रोत होते.
२) शेतीमध्ये चांगली जमीन व पाण्याची उपलब्धता या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढते. पिकांना योग्य वेळी संरक्षित पाणी आपण देऊ शकतो. ज्यामुळे आपल्या पिकांचे उत्पादन तर वाढतेच, पण त्याचबरोबर पिकांची गुणवत्ता सुद्धा वाढते.
३) पावसाळ्यामध्ये विशेषतः हस्त नक्षत्रामध्ये पाऊस जोरदार बरसतो. यावेळी शेताची बांधबंधिस्ती व्यवस्थित नसेल तर मोठ्या प्रमाणावर पाणी शेतातून वाहून पुढे नाल्यातून वाहून जाते. या पाण्याबरोबर शेतातील चांगली सुपीक माती जिला आपण सुपीक माती फर्टाईल सॉईल असे म्हणतो ती सुद्धा वाहून जाते. योग्य पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण आपल्या शेतातून वाहून जाणारे पाणी थांबवून आपल्या जमिनीची धूप थांबवतो. जमिनीची सुपीकता कायम ठेवतो.
४) सर्वसाधारण शेतकरी आपल्या शेती धंद्याबरोबर पशुपालनही करत असतो. या पशुपालनाचा त्याला शेतीपूरक पैसा उपलब्ध होण्याबरोबर सेंद्रिय खत सुद्धा मिळते. जे सेंद्रिय शेतीसाठी खूप आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये विशेषतः मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पाण्याची टंचाई मार्चपासूनच पुढे शेतकऱ्याला जाणवू लागते. या परिस्थितीमध्ये त्यांना आपली जनावरे जगवणे, त्यांच्यासाठी पाणी व चारा उपलब्ध करणे अवघड होऊन जाते. शेतकऱ्यांनी रेन हार्वेस्टिंग केले आपल्या घराजवळील बोरवेल किंवा विहीर पुनर्भरण केले असेल किंवा पावसाळ्यामध्ये त्याच्या घराचे छतावरील पाणी योग्य पद्धतीने घराजवळच प्लास्टिकच्या अगर कायमस्वरूपी सिमेंटच्या टाक्यांमध्ये साठवले तर त्याला पाण्याची उपलब्धता उन्हाळ्यात सुद्धा राहते. आणि त्याच्या पशुधनाला तो व्यवस्थितपणे चारा पाणी उपलब्ध करून देऊ शकतो.
५) रेन वॉटर हार्वेस्टिंग ही तशी खूपच सोपी प्रणाली आहे ज्यासाठी सुरुवातीचा खर्च व देखभाल खर्च सुद्धा खूप कमी आहे. शेतकऱ्यांनी हे काम उन्हाळा सुरु आहे तोपर्यंतच करून घ्यावे.
मुकुंदराव एम. पाटील
निवृत्त कार्य पालक संचालक, आरसीएफ, मुंबई
राजेंद्र कदम
निवृत्त मुख्य प्रबंधक, आरसीएफ, पुणे
9763458276
अधिक वाचा: उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय; वाचा सविस्तर