भिगवण : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण (यशवंत सागर जलाशय) यंदाची पाणी पातळी समाधानकारक असून, बुधवारी (दि. ८) पाणी पातळी ३८ टक्के झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी यंदा पाणीसाठा जास्त असल्याने शेतकरी वर्गासह उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस झाल्याने उजनी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरलेले होते.
याचा फायदा धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, मासेमार, औद्योगिक कारखाने, शहरांच्या पाणीपुरवठा योजनांना होत आहे.
बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट होत आहे. रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान ४.६७ टीएमसी पाणी बाष्पीभवन झाले.
तसेच, १ मार्च ते ६ एप्रिल या उन्हाळी कालावधीत १.६० टीएमसी पाणी कमी झाले आहे. उजनी जलाशयाच्या पाण्यावर दौड, इंदापूर, कर्जत, करमाळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.
नदीकाठच्या गावांमधील शेती पूर्णक्त उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाणी पातळी खाली गेल्यावर विद्युत पंप पाण्यासोबत खाली नेण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागते.
यामुळे पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्यास यापूढील काळात धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, मासेमार यांचे नियोजन कोलमडले जाते. पुढील शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन कालवा सल्लागार समितीला करावे लागणार आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग
◼️ सांडवा - ०० क्युसेक
◼️ वीज निर्मिती केंद्र - ०० क्युसेक
◼️ बाष्पीभवन (मि.मी./द.ल.घ.मी.) - ६.९८/१.४०
◼️ सीना-माढा उपसा सिंचन योजना - २७० क्युसेक
◼️ दहीगाव उपसा सिंचन योजना - २० क्युसेक
◼️ बोगदा - ९०० क्युसेक
◼️ मुख्य कालवा - २७३० क्युसेक
मागील वर्षी
◼️ नियंत्रित पाणी पातळी - ४९२.४०० मी.
◼️ एकूण साठा - ७३.८४ टीएमसी
◼️ उपयुक्त साठा - १०.१९ टीएमसी
◼️ उपयुक्त साठ्याची टक्केवारी-१९.०१%
उजनी धरण पाणी पातळी आकडेवारी
◼️ एकूण पाणी पातळी - ४९३.६२० मी.
◼️ पाणी पातळी क्षेत्र - २५१.४७ चौ.कि.मी.
◼️ एकूण साठा - २३८०.३५ द.ल.घ.मी. (८४.०५ टीएमसी)
◼️ उपयुक्त साठा - ५७७.५४ द.ल.घ.मी. (२०.३९ टीएमसी)
◼️ उपयुक्त साठ्याची टक्केवारी - ३८.०७%
अधिक वाचा: शेती महामंडळाच्या 'त्या' जमिनींचे मूळ मालक शेतकऱ्यांचे वारसच; जमिनी न दिल्यास जेल भरो आंदोलन
