कोल्हापूर : सततचा पाऊस आणि त्यातून घटलेली उसाची वाढ यामुळे विशेषता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वजनाला फटका बसला आहे.
एरव्ही राज्यात ऊस उत्पादनात आघाडीवर असणारा 'कोल्हापूर' विभाग काहीसा मागे राहिला असून त्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रात मात्र, उसाचे उत्पादनात फारसा फरक दिसत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यंदा ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहिल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाला.
सुरुवातीच्या टप्प्यात आडसाल लावणीची तोडणी मोठ्या प्रमाणात झाली. हंगाम सुरू होऊन अडीच महिने झाले आता लागण व खोडव्यांची तोड सुरू आहे.
आता उसाचा सरासरी उतारा दिसत असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकरी ५ ते ७ टनाचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मे महिन्यापासून पावसाने सुरू केली ते ऑक्टोबर अखेर राहिला. या कालावधीत सूर्यप्रकाश कमी राहिल्याने उसाच्या वाढीला पोषक वातावरण मिळालेच नाही.
सप्टेंबर महिन्यात वाढ झपाट्याने होते, पण या कालावधीतही एक सारखा पाऊस राहिल्याने वाढ खुंटली आणि त्याचा परिणाम आता वजनावर दिसत आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात साधारणता २ कोटी ४५ लाख टनापर्यंत गाळप होईल, गेल्यावर्षी पेक्षा १५ लाख टनाना गाळप कमी होईल असा अंदाज आहे.
या उलट सोलापूर, मराठवाड्यात उत्पादन चांगले मिळत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील उसाचे उत्पादन कमी होणार असले तरी उर्वरित महाराष्ट्रात ते भरून निघेल, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महापुराने तारले, पण सततच्या पावसाने मारले
◼️ मागील तीन-चार वर्षांचा अनुभव पाहता, महापूर ही कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची डोकेदुखी बनली होती.
◼️ महापुरात सरासरी ६५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित व्हायचे. त्याचा फटका उसाच्या उत्पादनावर व्हायचा.
◼️ पण, यावर्षी मे महिन्यापासून पाऊस राहिला असला तरी महापूर आलाच नाही.
◼️ त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना महापुराने तारले, पण सततच्या पावसाने मारले.
अधिक वाचा: शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 'हा' कारखाना देणार उसाला सरसकट १०० रुपये अनुदान
