कोल्हापूर : सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे यंदा उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झालेली नाही. त्याचा परिणाम सध्या जाणवत असून, हंगामाच्या सुरुवातीलाच बहुतांश उसांना तुरा फुटल्याने वाढ खुंटली आहे.
साखर तयार करण्याची प्रक्रिया थांबल्याने उसाचे वजन कमी होत आहे. आडसाल लावणीच्या उसाला हेक्टरी १० टनांचा फटका बसत असून, पुढे खोडव्याचे गाळप सुरू झाल्यानंतर यापेक्षाही उसाचे उत्पादन कमी होण्याचा धोका आहे.
यंदा मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला तो ऑक्टोबरपर्यंत राहिला. मध्यंतरीचा थोड्या दिवसांचा अपवाद वगळता एकसारखा पाऊस पडल्याने जमिनीला वाफसा आला नाही.
अनेक ठिकाणी तर उसाला रासायनिक खतांचा मिरगी डोसही देता आला नाही. साधारणतः सप्टेंबर महिन्यात पाऊस उसंत घेतो, त्यावेळी उसाची वाढ झपाट्याने होते.
मात्र, यंदा पाऊस थांबलाच नसल्याने वाढ खुंटली आहे. त्यात आता उसाला तुरे आल्याने वजनालाही मार खावा लागत आहे. दरम्यान, सततच्या संकटाने शेतकरी धास्तावला आहे.
उसाला तुरे फुटणे म्हणजे
◼️ उसाच्या वाढीच्या अवस्थेत फुले येणे, ज्यामुळे उसाची वाढ थांबते आणि साखरेचे प्रमाण कमी होते, वजनात घट होते.
◼️ हे हवामानातील बदल, चुकीची लागवडवेळ आणि असंतुलित खतांमुळे घडते. तुरा आल्यावर ऊस लवकर तोडणे आवश्यक असते, नाहीतर त्याला 'पांगशा' फुटतात.
तुरे येण्याची कारणे
१) हवामान : सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये सतत पाऊस, दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठे अंतर राहिले.
२) पाण्याची उपलब्धता : जमिनीत पाणी साचून राहिल्याने.
३) खते : नत्राचा असंतुलित वापर किंवा कमतरता.
४) लागवडीचा काळ : शिफारस केलेल्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळी लागवड करणे.
असा होत आहे उसावर परिणाम
उसाची खोडात साखर भरण्याची प्रक्रिया थांबते. वजनात ५ ते १० टक्के घट, ज्यामुळे शेतकऱ्यांवे आर्थिक नुकसान होते. काही जातींमध्ये तुरा आल्यावर बाजूने फुटवे (पांगशा) फुटतात.
गेल्या वर्षी आणि आताही उसाला उतारा मिळाला नाही. महागडी खते घालूनही सततच्या पावसाने उसाची वाढ झाली नाही. त्यामुळे साधारणतः हेक्टरी आठ ते दहा टनांचा फटका बसत आहे. - शामराब बरुटे, शेतकरी, आमजाई व्हरवडे
अधिक वाचा: राज्यातील साखर कारखान्यांनी थकलेली उसाची बिले १५ टक्के व्याजासह द्यावीत; नाहीतर उग्र आंदोलन
