सोलापूर : दूध खरेदी दराची घसरण थांबली असून आता हळूहळू खरेदी दरात वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यापर्यंत २८ रुपयांनी खरेदी होणाऱ्या सोनाई दूध संघाच्या दुधाला दोन रुपयांची वाढ होऊन आता ३० रुपये झाली आहे.
इंदापूर येथील सोनाई दूध संघाचे रोज ३० लाख लिटर दूध संकल होते आणि राज्यभर पुरवठा केला जातो. यामुळे आता राज्यातील इतर दूध संघाचे भावही वाढण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली होती. खरेदी दरात घसरण झाल्याने राज्य शासनाने प्रति लिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले होते.
मागील वर्षात राज्यातील गाय दूध खरेदीवर प्रति लिटर ५ रुपये अनुदान दिले आहे. जवळपास ५ महिन्यांचे अनुदान दिले असून दोन महिन्यांचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. शासन अनुदान देत असल्याने दूध खरेदी वाढ होत नव्हती.
मात्र डिसेंबर महिन्यात शेवटी शेवटी दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ करीत २९ रुपये तर १ जानेवारीपासून आणखीन एक रुपया असे एक लीटर दूध खरेदीला दोन रुपये वाढ झाले आहेत म्हणजे आता गाय दूध खरेदी प्रति लिटर ३० रुपयाने होणार आहे.
वारणा, गोकुळ अगोदरच ३० रुपये
- गोकुळ, वारणाचे (कोल्हापूर) संपूर्ण गाय दूध खरेदी प्रति लिटर ३३ रुपये तर राजाराम बापू पाटील (सांगली) सहकारी दूध संघाचे विभागनिहाय दर कुठे ३३ तर कुठे ३२ रुपये दिले जात होते.
- विधानसभा निवडणूक झाल्यानंतर गोकुळ, वारणा व राजारामबापू या दूध संघांनी दूध खरेदी दर तीन रुपयांनी कपात केली होती. आता या तीनही संघांचा गाय दूध खरेदी दर ३० रुपये प्रति लिटर इतका आहे.
अनुदान तर बंद झालंय?
जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत प्रति लिटर ५ रुपये अनुदान राज्य शासनाकडून देण्यात आले आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत प्रति लिटर सात रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्याचे वितरण करण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आता दूध खरेदी दरात वाढ होऊ लागल्याने शासनाचे अनुदान बंद होईल असे सांगण्यात आले.
संकलन व मागणीत फार फरक झालेला नाही. मात्र, दुधाला मागणी वरचेवर वाढत आहे व आणखीन वाढण्याचा अंदाज आहे. शिवाय दूध उत्पादकांसाठी दूध खरेदी दर वाढ करणे गरजेचे आहे. मागील आठवड्यापर्यंत प्रति लिटर २८ रुपये असलेला दर दोन रुपयांची वाढ करीत ३० रुपये केला आहे. बाजारातील परिस्थितीनुसार खरेदीदरात आणखीनही वाढ होऊ शकते. - दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध संघ, इंदापूर
अधिक वाचा: व्याल्यानंतर ९० दिवसात म्हैशी पुन्हा गाभण राहण्यासाठी कसे कराल व्यवस्थापन; वाचा सविस्तर