Ganesh chaturthi Special : अशी झाली गणेशोत्सवाला सुरुवात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 16:29 IST2018-09-12T16:27:52+5:302018-09-12T16:29:57+5:30
गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तीभावाने गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Ganesh chaturthi Special : अशी झाली गणेशोत्सवाला सुरुवात!
गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तीभावाने गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 10 दिवसांच्या या उत्सवादरम्यान भक्तांच्या श्रद्धेनुसार, दीड, तीन, पाच, सात किंवा मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचं धुमधड्याक्यात विसर्जन करण्यात येतं. पण तुम्हाला माहिती आहे का? खरी गणेशोत्सवाची सुरुवात कधीपासून झाली? आणि कोणी सुरूवात केली?
पेशवाईमध्ये झाली होती गणेशोत्सवाची सुरुवात
10 दिवसांचा गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. यामागील कारण म्हणजे या महोत्सवाची सुरुवातही महाराष्ट्रातून झाली होती. याबाबत इतिहासामध्ये वळून पाहिलं की असं दिसून येतं की, भारतात पेशवाईमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत असे. पेशवे मोठ्या उत्साहात गणपतीचं स्वागत करत असत.
असं म्हटलं जातं की, सवाई माधवराव पेशव्यांच्या काळापासूनच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवसापासून 10 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. पेशवे काळात शनिवार वाड्यामध्ये 10 दिवसांच्या उत्सवाचं आयोजन करण्यात येत असे. परंतु त्यानंतर ब्रिटिशांनी पेशवाईवर ताबा मिळवला त्यानंतर गणेशोत्सवाचा उत्साह कमी झाला.
तरिही गणेशोत्सवाची परंपरा मात्र सुरूच राहीली. मात्र ब्रिटिशांच्या शासन काळामध्ये हळूहळू हिन्दू राज्यांमध्ये फूट पडू लागली. त्यानंतर भावनात्मक आणि धार्मिक गोष्टींमध्येही फूट दिसून येत राहिली.
ब्रिटिशांच्या काळातील गणेशोत्सव
ब्रिटिशांच्या काळामध्ये दुरावलेल्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एक शक्कल लढविली. त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवसांपासून पुढील 10 दिवसांपर्यंत गणपती बसवला जाऊ लागला. त्यानंतर 11व्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन करण्यात येऊ लागलं. 1893 रोजी पहिल्यांदा ब्रिटिशांच्या काळामध्ये गणेशोत्सव साजर करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत गणेशोत्सव फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊ लागला.