अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाचे आणि स्वयंभू गणपती. अष्टविनायकांमधील प्रत्येक गणपतीचं महत्त्व आणि महती वेगळी आहे. माहाराष्ट्रातील या गणपतींना पेशवाईमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रामध्ये असलेल्या या आठ गणपती मंदिरांना मिळून 'अष्टविनायक' असं संबोधलं जातं. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक देशी-विदेशी भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. आज आपण जाणून घेऊया अष्टविनायकांचे महत्त्व आणि महती... 

मोरगावचा मयुरेश्वर

अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर. येथील मूर्ती अतिशय सुंदर आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती असून उत्तराभिमूख आहे. उजवा गुडघा छातीजवळ घेऊन बसलेल्या या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे. श्रींच्या भालप्रदेशावर आणि नाभीमध्ये रत्न जडविलेले आहेत. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत.

श्रींच्या मूर्तींबाबत एक अशी अख्यायिका सांगितली जाते की, मूर्तीच्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात लोह आणि रत्नाच्या अणूंपासून मोरेश्वराची मूर्ती बनविलेली आहे. तिची प्रथम स्थापना ब्रम्हदेवाने केली होती. सिंधू दैत्याने दोनवेळा त्या मूर्तीचा विध्वंस केला. मात्र, ब्रम्हदेवाने तिची पुनःप्रतिष्ठापणा केली. त्यानंतर द्वापारयुगात पांडव भूस्वानंद क्षेत्री आले आणि त्यांनी मूळ मूर्तीला काही होऊ नये म्हणून तांब्याच्या पत्र्याने आच्छादित करून नियमीत पुजेसाठी सध्याच्या मूर्तीची स्थापना केली.

सिद्धटेकचा सिद्धीविनायक

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर सिद्धटेक हे गाव आहे. श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर टेकडीवर उत्तराभिमूख असून त्यावर सुंदर कलाकूसर केलेली आहे. मंदिराचा गाभारा बराच मोठा आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस सभामंडप आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातच देवाचे शेजघर आहे. श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून 3 फूट उंच व 2.5 फूट लांबची आहे. मूर्ती उत्तराभिमूखी गजमुखी आहे. अष्टविनायकातील उजवीकडे सोंड असलेली ही एकमेव मूर्ती आहे.

पालीचा श्री बल्लाळेश्वर

पालीचा श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. श्री बल्लाळेश्वर गणपती एका भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. श्री बल्लाळेश्वराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिराची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. श्री बल्लाळेश्वराचे श्रद्धास्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आहे. सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे.

महडचा श्री वरदविनायक

महडचा श्री वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. दगडी महिरप मंदिरात सिंहासनारूढ झालेल्या श्री वरदविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीची या मंदिरातील प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. इ.स. 1775 मध्ये पेशवाई काळात हे मंदिर बांधण्यात आले आहे. या गणेशस्थानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भक्तांना स्वहस्ते पूजा करता येते. देवाजवळ कधीही हवन नसते. 1892 पासून येथे नंदादीप तेवत असल्याचेही सांगितले जाते.

थेऊर गावचा चिंतामणी

असं सांगितलं जातं की, अभिजीत नावाचा एक राजा होता. त्याची पत्नी गुणवती. त्यांचा मुलगा गण. गणाचा जन्म रानावनात तपश्चर्या केल्यानंतर झाला. तो मोठा झाल्यानंतर जेवढा पराक्रमी झाला तेवढाच तापट होता. एकदा तो कपिलमुनींच्या आश्रमात गेला. त्यांच्याकडे चिंतामणी रत्न होते. या रत्नाच्या सामर्थ्याने त्यांनी त्याला भोजन इत्यादी दिले. गणाला या रत्नाचा मोह झाला आणि त्याने कपिलमुनींकडे ते रत्न मागितले. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला. गणाने कपिलमुनींकडील चिंतामणी रत्न चोरले. याचे मुनींना अतिशय वाईट वाटले. त्यांनी विनायकाची आराधना केली. विनायक प्रसन्न झाले आणि त्यांनी कपिलमुनींना त्यांचे गेलेले रत्न परत मिळवून देण्याचे वचन दिले.

चिंतामणी रत्न मिळविण्यासाठी विनायकाला गणासोबत युद्ध करावे लागले. विनायकाने गणाला ठार केले. मग त्याचा पिता राजा अभिजीतने विनायकाला ते चिंतामणी रत्न परत केले. विनायक ते रत्न देण्यासाठी कपिलमुनींकडे गेला. मात्र, त्यांनी ते रत्न स्विकारले नाही आणि ते विनायकालाच अर्पण केले. तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केले आणि ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच वास्तव्य केले.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा अष्टविनायकापैकी सहावा गणपती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या सहवासात कुकडी नदीच्या परिसरातील डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे चारशे पायर्‍या आहेत. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून सात किलोमिटर अंतरावर आहे. पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

ओझरचा विघ्नेश्र्वर

ओझरचा विघ्नेश्र्वर हा अष्टविनायकांतील सातवा गणपती. अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराची ओळख आहे. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत श्रद्धास्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावपासून अवघ्या आठ किलो मीटर अंतरावर ओझर हे गाव आहे. गजाननाने येथे विघ्नासुराचा वध केला आणि नंतर इथेच वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे.

Web Title: Ganapati Festival 2019 ashtavinayaka temple of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.