प्रवासी वाहतुकीचे नियम धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:43 PM2020-11-23T23:43:01+5:302020-11-23T23:43:22+5:30
वसईमध्ये रिक्षात प्रवाशांची कोंबाकोंब : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष ; कोरोनावाढीला निमंत्रण
मंगेश कराळे
नालासोपारा : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यातच नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने चिंता व्यक्त होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून टीका केली जात आहे. वसईत सार्वजनिक प्रवासी सेवा हळूहळू रुळावर येत असली तरी ती अद्याप अपुरी आहे. त्यामुळे वसईकर मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. मात्र दाटीवाटीने होणाऱ्या प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका आहे. प्रवासी साधन असलेल्या तीनचाकी रिक्षा, टाटा मॅजिकमधूनही धोकादायक वाहतूक सध्या वसईत सुरू असून त्यावर वाहतूक विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने वसईत कोरोनावाढीला आमंत्रण देण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे. रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना परवानगी असताना रिक्षाचालकांकडून नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची कोंबाकोंब करण्यात येते.
वसईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा २७ हजारांच्या पार पोहोचला आहे. येथे या आजारामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही ८५३ पर्यंत पोहोचला आहे. कोविड चाचणी केलेल्या नागरिकांची व देखरेखीखाली ठेवलेल्या नागरिकांची संख्या मोठी असतानादेखील वसई-विरारमध्ये सर्रास प्रवासी वाहनांतून सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे व आदेशांचे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने कसोशीने पालन केले पाहिजे. प्रवासी वाहतुकीचा तर अक्षरश: बोजवारा उडाला असून दाटीवाटीने प्रवासी नेण्याचे काम रिक्षाचालक करत आहेत. तीनचाकी रिक्षात केवळ दोनच प्रवाशांना नेण्याची मुभा रिक्षाचालकांना आहे, तर प्रवासी टाटा मॅजिकमध्येही नियमांचे बंधन आहे. परंतु रिक्षाचालक कमाईसाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडत असल्याचे दिसते.
सध्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक साधने अपुरी असल्याने नागरिकांना कामावर जाण्यासाठी किंवा इच्छित स्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी खासगी रिक्षाचालक रिक्षा पूर्ण भरल्याशिवाय निघत नाहीत. रिक्षाचालकांच्या बेपर्वा वागणुकीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अजून वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
वसई तालुक्यात सर्रास रिक्षाचालक नियम धाब्यावर बसवून दाटीवाटीने प्रवाशांची वाहतूक करताना दिसत आहेत. देशात आणि राज्यात सध्या समूह संसर्गाचा धोका मोठा असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. अशा प्रसंगी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे असताना खासगी रिक्षाचालक मात्र कोरोनालाच धाब्यावर बसवून आर्थिक कमाईच्या कामात व्यस्त झाले आहेत. या अवैध कारभारावर वाहतूक विभागाने तत्काळ कारवाईसाठी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगणार. नंतर या बाबीकडे जातीने लक्ष घालून लवकरच या रिक्षांवर आणि चालकांवर कारवाई करणार आहे.
- विनोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग, वसई