आदर्श आचारसंहिता; रथावरील मोदींचा चेहरा परवान्याअभावी झाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:20 AM2019-04-01T09:20:24+5:302019-04-01T09:23:52+5:30

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच यानिमित्ताने होताना दिसून येत आहे.

Model Code of Conduct; Modi's face on the chariot covered his face due to lack of license | आदर्श आचारसंहिता; रथावरील मोदींचा चेहरा परवान्याअभावी झाकला

आदर्श आचारसंहिता; रथावरील मोदींचा चेहरा परवान्याअभावी झाकला

Next
ठळक मुद्देसोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचार करण्यास सुरुवात भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता चार तर माढा मतदारसंघात तीन प्रचार रथांच्या वाहनांसाठी परवानगी मागितली वंचित आघाडीच्या उमेदवाराकडून एका प्रचार वाहनासाठी परवानगी मागण्यात आली

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी तैनात केलेल्या वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी योजनेतून परवानगी देण्यात येते. भाजपकडून प्रचारासाठी सात रथ एलईडी  स्क्रीनसह सज्ज करण्यात आले आहेत. या वाहनांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून प्रचाराची परवानगी मिळेपर्यंत रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा कागदाने झाकण्यात आला. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच यानिमित्ताने होताना दिसून येत आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता चार तर माढा मतदारसंघात तीन प्रचार रथांच्या वाहनांसाठी परवानगी मागितली आहे. याशिवाय उमेदवाराकडून एका रथाचा अर्ज असून, त्यास परवानगी देण्यात आली आहे. पक्षीय पातळीवरून आलेल्या तीन वाहनांची कागदपत्रे व आरटीओ कार्यालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या रथाच्या प्रचाराला हिरवा कंदील जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळणार आहे. परवानगी मिळेपर्यंत प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने व त्या वाहनांवरील सर्व चिन्हे व नेत्यांची छबी निवडणूक कार्यालयाकडून झाकण्यात येत  आहे.

काँग्रेसकडून सात प्रचार रथांची परवानगी मागण्यात आली आहे. यात उमेदवाराकडून मागणी आलेल्या पाच प्रचार रथांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचार रथाला परवानगी देण्यासाठी संबंधित वाहनांची कागदपत्रे, फिटनेस याबाबत आरटीओ कार्यालयाकडून तर गुन्हेगारी परिस्थितीबाबत पोलिसांकडून अहवाल मागविण्यात येतो.

वंचित आघाडीच्या उमेदवाराकडून एका प्रचार वाहनासाठी परवानगी मागण्यात आली आहे. यासाठी आरटीओ कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे काम सुरू आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वाहनांच्या प्रचारास परवानगी देण्यात येईल. उमेदवारांकडून सुरू करण्यात आलेल्या प्रचार वाहनांचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात तर पक्षपातळीवरून आलेल्या वाहनांचा खर्च आयोगाकडे पक्षपातळीवर देण्यात येणार असल्याची माहिती एक खिडकी योजनेतील अधिकाºयांनी दिली. 

कॉर्नर सभेच्या मैदानांसाठी मागणी
- सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात माढा लोकसभा मतदारसंघातही प्रचाराचा जोर वाढणार आहे. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉर्नर सभा वा बैठकीसाठी जागेच्या परवानगीसाठी एक खिडकीकडे अर्ज येत आहेत. जाहीर सभा घेण्यासाठी शहरातील मैदान देण्याबाबत अजून तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडून मागणी आली नाही. 

Web Title: Model Code of Conduct; Modi's face on the chariot covered his face due to lack of license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.