गेल्या ३० वर्षांतील मतदारसंघातील रोजगाराची आकडेवारी विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:38 AM2019-04-02T03:38:09+5:302019-04-02T03:38:42+5:30

सुनील तटकरे : पेण येथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आघाडीची सभा

Disposal of employment in the last 30 years of the constituency | गेल्या ३० वर्षांतील मतदारसंघातील रोजगाराची आकडेवारी विदारक

गेल्या ३० वर्षांतील मतदारसंघातील रोजगाराची आकडेवारी विदारक

googlenewsNext

पेण : भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश होणार असेल तर या तरुणांच्या रोजगाराचा विचार आताच व्हायला हवा. गेल्या ३०वर्षांतील आपल्या मतदारसंघातील रोजगाराची आकडेवारी पाहिली तर विदारक असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. देशात रोजगार निर्माण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी के ले.

सोमवारी ते पेण येथील आगरी समाज भवन येथे आयोजित राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते. भाजपा आणि त्यांच्यासोबत फरफटणारी शिवसेना यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ फक्त एकमेकांवर टीका करण्यातच गेला. सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून शिवसेनेने सरकारच्या प्रत्येक निर्णयावर केवळ टीकाच केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रत्येक अग्रलेखातून पंतप्रधान, मुख्यमंत्री व भाजपावर टीकाच होताना आपण पाहत आलो. पण आता सत्तेसाठी यांनी युती केली आहे. मात्र, ही युती गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी, तरु णांसाठी, महिलांसाठी काही करू शकली नाही, याबाबत आता जनताच त्यांना उत्तर देणार आहे, असे म्हणत तटकरे यांनी युती सरकारचा समाचार घेतला.

नागोठणे परिसरातील बेणसे गावात सभामंडपाचे काम पूर्ण झाल्याचा खोटा उल्लेख गीते यांच्या कार्यअहवालात केला आहे. तिथल्या कार्यकर्त्यांनी त्या जागेचे फोटो पाठवून तिथे सभामंडप झालाच नसल्याचे सांगितले आहे. हा सभामंडप चोरीला गेला की काय? असा टोला लगावत सुनील तटकरे यांनी गीते यांच्या कार्यअहवालातील खोटेपणा उघडा पाडला. अशी फसवाफसवी करत आजवर तुम्ही निर्वाचित झालात पण आता लोक शहाणे झाले आहेत. ते तुमच्या भूलथापांना फसणार नाहीत, असे तटकरे यांनी नमूद केले. आपण खासदार झाल्यानंतर रायगडमध्ये कागदाचा कारखाना आणू, त्यासाठी बांबूची लागवड करा, अस गीतेंनी सांगितलं होतं. तो कागदाचा कारखाना आजतागायत आला नाही. पंतप्रधानांनी विरोध केला म्हणून कारखाना आणू शकलो नाही, असे ते एकदा मुलाखतीत बोलले होते. आता युती झाल्यावर त्यांनी हे पुन्हा बोलून दाखवावे, असे आव्हान तटकरे यांनी केले.
यावेळी आ. धैर्यशील पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, ज्येष्ठ नेते बाळाजीशेठ म्हात्रे, बापूसाहेब नेने, चंद्रकांत पाटील, सीताराम कांबळे व तालुक्यातील पदाधिकारी तसेच आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Disposal of employment in the last 30 years of the constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.