शरद पवारांची भेट घेतली, सविस्तर चर्चा केली; बाहेर येताच पक्षप्रवेशाबद्दल वसंत मोरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:21 PM2024-03-14T17:21:39+5:302024-03-14T17:24:33+5:30

मी शरद पवारांना काही विषयांची माहिती देण्याबाबत भेटलो असून आपण राजकीय निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ घेणार असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

Vasant More reaction on joining the ncp sharad pawar party | शरद पवारांची भेट घेतली, सविस्तर चर्चा केली; बाहेर येताच पक्षप्रवेशाबद्दल वसंत मोरे म्हणाले...

शरद पवारांची भेट घेतली, सविस्तर चर्चा केली; बाहेर येताच पक्षप्रवेशाबद्दल वसंत मोरे म्हणाले...

Vasant More Sharad Pawar Meeting ( Marathi News ) : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले नेते वसंत मोरे यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील कार्यालयात भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे हेदेखील उपस्थित होते. मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे हे नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात असल्याने ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज मोरे यांनी आपण शरद पवारांना काही विषयांची माहिती देण्याबाबत भेट घेतल्याचं सांगितलं असून आपण राजकीय निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर वसंत मोरे म्हणाले की, "पुणे लोकसभा मतदारसंघाची सध्याची स्थिती काय आहे, याबाबत मी शरद पवारसाहेबांना माहिती दिली. त्यांना सर्व परिस्थिती माहीत आहे. मी उभा राहिल्यास कसा निवडून येऊ शकतो, याबाबतची माहिती मी त्यांना दिली. तसंच जयंत पाटील यांनी काही गोष्टी लेखी स्वरुपात मागवल्या होत्या. त्या मी आज दिल्या आहेत," असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

वसंत मोरेंना अनेक पक्षांकडून ऑफर

मनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत येण्याची विनंती केली होती. त्यानंतर पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली.   

दरम्यान, "मी लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करावा याबाबत जोशींनी माझी भेट घेतली होती. मी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. मला मनसेमधील अनेक नेत्यांचे फोन आले. मात्र मी परतीचे दोर कापलेले आहेत," असं यापूर्वी वसंत मोरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. 
 

Web Title: Vasant More reaction on joining the ncp sharad pawar party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.