अजितदादांचं ओपन चॅलेंज, दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे थेट पवारांच्या भेटीला; बाहेर पडताच म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 11:11 AM2023-12-26T11:11:55+5:302023-12-26T11:18:15+5:30

अजित पवार यांनी काल खासदार अमोल कोल्हे यांना उघड आव्हान देत आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करणार असल्याचं सांगितलं होतं.

Ajit pawars open challenge shirur ncp mp Amol Kolhe meets sharad pawar in pune | अजितदादांचं ओपन चॅलेंज, दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे थेट पवारांच्या भेटीला; बाहेर पडताच म्हणाले...

अजितदादांचं ओपन चॅलेंज, दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे थेट पवारांच्या भेटीला; बाहेर पडताच म्हणाले...

Amol Kolhe NCP ( Marathi News ) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षात उभी पडली. या फुटीनंतर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमधील संघर्षाला धार आली असून काल अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांना उघड आव्हान देत आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करणार असल्याचं सांगितलं. या पार्श्वभूमीवर आज अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुसंस्कृत राजकारण करणार आहे. मी आहे तिथेच आहे, मात्र ज्यांनी भूमिका बदलली त्यांनी ती का बदलली याचा विचार करणं गरजेचं आहे," अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. अजित पवार यांनी काल अमोल कोल्हे यांना आव्हान देत असताना ते मतदारसंघात फिरत नव्हते, अशी टीकाही केली. याबद्दल बोलताना खासदार कोल्हे म्हणाले की, "मी आधी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडून काही चूक होत असेल तर दादांना माझा कान पकडण्याचा अधिकार होता. त्यांचे काही आक्षेप असतील तर मी त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही करायला तयार आहे."

अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं असलं तरी त्यांच्याविरोधात टोकदार भूमिका घेणं टाळलं आहे. "मी चार-साडेचार वर्ष अजित पवारांच्या नेतृत्वात काम केलं आहे. तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून पाठबळ दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आता एकदा माझ्याविरोधात वक्तव्य केलं म्हणून मी लगेच त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही," असं ते म्हणाले.

"दिल्लीसमोर मान न झुकवण्याची शिवरायांची शिकवण"

अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधताना काल अजित पवार म्हणाले होते की, "खासदार कोल्हे हे वर्षभरापूर्वीच राजीनामा देणार होते. राजकारणाचा माझ्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होत असल्याचं ते म्हणाले होते. तसंच मी शिवाजी महाराजांवर केलेला एक सिनेमाही चालला नाही, असं त्यांनी मला सांगितलं होतं," असा दावा अजित पवारांनी केला. अजित पवारांच्या या दाव्यावर बोलताना अमोल कोल्हेंनी त्यांना टोला लगावला आहे. "शिवाजी महाराजांच्या सिनेमाचा अजित पवारांनी उल्लेख केला. त्यात महाराजांना दिल्लीश्वर दख्खनची सुभेदार द्यायला तयार होते. दख्खनचा प्रदेश हा स्वराज्यापेक्षा कैक पटीने मोठा होता. मात्र त्यापेक्षा महाराजांनी तत्व महत्त्वाचे मानले आणि दिल्लीसमोर झुकायला नकार दिला. महाराजांवर बनवलेला सिनेमा किती चालला हे महत्त्वाचं नाही, त्यापेक्षा महाराजांनी दिलेली ही शिकवण माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळेच मी तत्त्वांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला," अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

शरद पवारांकडून मार्गदर्शन

शरद पवार यांच्या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "आजच्या दिवसाची सुरुवात संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आणि फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्र व देशाचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या लोकनेत्याला भेटून केली. आज देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि उद्या दिनांक २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या दरम्यान होणाऱ्या किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे  शेतकरी आक्रोश मोर्चाच्या तयारीबद्दल माहिती दिली. आदरणीय शरद पवार साहेबांचं धोरण हे कायमच शेतकरी हिताचं असतं, म्हणूनच त्यांना मायबाप जनता 'शेतकऱ्यांचा कैवारी' म्हणून ओळखते. या शेतकरी आक्रोश मोर्चा बद्दल त्यांचं याआधी सुद्धा मोलाचं मार्गदर्शन मिळालं होतं. आजची त्यांची भेट शेतकऱ्यांसाठी आणखी जोमाने लढण्याची ऊर्जा व प्रेरणा देणारी होती. यावेळी आमदार अशोक बापू पवार सुद्धा सोबत होते," अशी माहिती अमोल कोल्हेंनी दिली.

Web Title: Ajit pawars open challenge shirur ncp mp Amol Kolhe meets sharad pawar in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.