काँग्रेसचे सेनापतीच रणांगणात उतरणार नाही; मल्लिकार्जुन खरगेंची रणनीती काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:15 PM2024-03-12T12:15:07+5:302024-03-12T12:22:16+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत कुणी भाष्य केले नाही. परंतु या बातमीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

मल्लिकार्जुन खरगे हे स्वत:च्या प्रचारात व्यस्त राहण्याऐवजी व्यापकरित्या पक्षाच्या प्रचारावर फोकस करण्यास उत्सुक आहेत. केवळ एका मतदारसंघात गुंतून न राहता देशभरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खरगे जाण्याची तयारी करत आहेत. ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीनं दिली आहे.

रिपोर्टनुसार, कर्नाटकाच्या उमेदवार यादीत खरगे यांच्या नावावर सर्वसमंती बनली होती. गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून खरगे निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं. परंतु सूत्रांनुसार, खरगे त्यांच्याऐवजी जावई राधाकृष्णन डोड्डामणी यांना या जागेवर उभं करू इच्छितात.

मल्लिकार्जुन खरगे हे दोनवेळा गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेत. २०१९ च्या निवडणुकीत खरगेंना पराभव सहन करावा लागला. त्यानंतर ते राज्यसभेत खासदार म्हणून गेले. खरगे हे राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायला अजून ४ वर्ष बाकी आहेत.

खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे हे कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहेत. ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत असं रिपोर्टमध्ये म्हटलंय. परंतु प्रत्यक्षात काँग्रेस सार्वत्रिक निवडणुकीत राज्य मंत्र्यांना उतरवत नाही. त्यामुळे खरगे यांनी जावयाला निवडणुकीत उतरवण्याचं ठरवलं आहे.

काँग्रेसमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडणूक न लढण्याचा कोणता रेकॉर्ड नाही. अलीकडेच सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी निवडणूक लढली आणि जिंकलीही. पण राहुल गांधींनी २०१९ मध्ये २ ठिकाणाहून अर्ज भरला. त्यातील अमेठीतून राहुल गांधींना स्मृती इराणींसमोर हार पत्करावी लागली.

दुसरीकडे भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा हेदेखील लोकसभा निवडणूक लढणार नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये तत्कालीन भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि अमित शाह यांनी लखनऊ आणि गांधीनगर भागातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता.

इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणावे असा प्रस्ताव आणला. परंतु खरगेंनी यावर नकार देत निवडणूक निकालानंतर यावर चर्चा करू असं म्हटलं होते.

दरम्यान, २०२२ मध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात काँग्रेस पार्टीने एक ठराव केला होता, त्यावर अनेक चर्चा झाल्या. एका कुटुंबातील एकाच सदस्याला आमदार किंवा खासदारकीचे तिकीट दिले जाईल असा ठराव खरगेंनी मांडला होता.

८१ वर्षीय मल्लिकार्जुन खरगे हे मागासवर्गीय समुदायातून पुढे आलेले आहेत. ते लोकसभेत विरोधी पक्षनेतेही होते. मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात खरगे यांच्यावर रेल्वे आणि कामगार-रोजगार मंत्रालयाची जबाबदारी होती.