महादेव जानकरांचा ताफा अडवून दाखविले काळे झेंडे; गावात येण्यापासून रोखले

By ज्ञानेश्वर भाले | Published: April 10, 2024 12:47 PM2024-04-10T12:47:10+5:302024-04-10T12:49:13+5:30

आंदोलक आपल्या भूमिकेला अडून राहिल्याने कुणाचेच काही चालले नाही.

Black flags shown to Mahadev Jankar; prevented from coming to the village | महादेव जानकरांचा ताफा अडवून दाखविले काळे झेंडे; गावात येण्यापासून रोखले

महादेव जानकरांचा ताफा अडवून दाखविले काळे झेंडे; गावात येण्यापासून रोखले

परभणी : पालम तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोगाव येथील मारुती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मराठा आंदोलकांकडून रोखण्यात आले. यादरम्यान, आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करत जानकरांना विरोध दर्शवला.

मंगळवारी जानकर हे गंगाखेड, पालम शहरातील कार्यकर्त्यांची धावती भेट घेऊन भोगावकडे निघाले हाेते. यादरम्यान, पेठशिवणीच्या महादेव मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्यासोबत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, जिल्हा बँकेचे संचालक गणेशराव रोकडे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, सभापती गजानन रोकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भैय्या सिरस्कार, उबेदखा पठाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भोगावकडे वाहनांतून निघाल्यानंतर सुरुवातीला पदाधिकाऱ्यांच्या गाड्या, तर पाठीमागील वाहनातून जानकर येत होते. 

सर्वांना मराठा आंदोलकांनी भोगाव फाट्यावरच रोखले. प्रारंभी पदाधिकारी वाहनातून खाली उतरून आंदोलकांना समजावून सांगत होते. परंतु, आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने एकाही पदाधिकाऱ्यांचे काहीच चालले नाही. घोषणाबाजी करून आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून जानकरांना विरोध दर्शवला. प्रचाराऐवजी आपण हनुमान मंदिरात दर्शन घेऊन परत जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले. परंतु, आंदोलकांनी कोणाचेही ऐकले नाही. उलट कोणत्याही पक्षाच्या उमेदवारास गावात येऊ देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली.

जानकर १५ मिनिटे वाहनात थांबून
या सर्व घडामोडींदरम्यान महादेव जानकर याठिकाणी जवळपास १५ मिनिटे आपल्या वाहनात थांबून होते. परंतु, आंदोलक आपल्या भूमिकेला अडून राहिल्याने कुणाचेच काही चालले नाही. शेवटी जानकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मागे वळण्याचे सांगत ते स्वतःहून पदाधिकाऱ्यांसह माघारी परतले. जिल्ह्यात जानकरांबाबत दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे.

Web Title: Black flags shown to Mahadev Jankar; prevented from coming to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.