मोदींच्या सभेनंतर यंत्रणेने सोडला सुस्कारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:40 AM2019-04-08T00:40:34+5:302019-04-08T00:43:09+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडात नरेंद्र मोदी यांच्या सभेची घोषणा झाल्यानंतर पोलिसांसह यंत्रणेची झोप उडाली होती़ गेल्या पाच दिवसांपासून यंत्रणा अहोरात्र सभेच्या नियोजनात व्यस्त होती़

After the meeting of Modi, the officer take relife | मोदींच्या सभेनंतर यंत्रणेने सोडला सुस्कारा

मोदींच्या सभेनंतर यंत्रणेने सोडला सुस्कारा

Next
ठळक मुद्देकर्मचारी होते मुक्कामी पोलिसांसह यंत्रणेची झाली चांगलीच दमछाक

शिवराज बिचेवार।
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडातनरेंद्र मोदी यांच्या सभेची घोषणा झाल्यानंतर पोलिसांसह यंत्रणेची झोप उडाली होती़ गेल्या पाच दिवसांपासून यंत्रणा अहोरात्र सभेच्या नियोजनात व्यस्त होती़ परंतु, उत्कृष्ट नियोजनामुळे सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही़ लाखांवर लोक सभेला उपस्थित होते़ परंतु, कुठेही गडबड गोंधळ झाला नाही हे विशेष़
मोदी यांच्या सभेसाठी सायंकाळची वेळ निवडण्यात आली होती़ सभेचे ठिकाणही शहरापासून काहीसे दूर असलेल्या मामा चौक निश्चित करण्यात आले होते़ या ठिकाणी मोकळ्या असलेल्या मैदानाची स्वच्छता करण्यासाठी पाच दिवसांपासून कामगार कामाला लागले होते़ मैदानातील झाडेझुडपे त्याचबरोबर पार्कींगसाठी निवडलेल्या जागा याची स्वच्छता करण्यात आली़ मामा चौकाकडून आयजी आॅफिसकडे जाणाऱ्या रस्त्याचेही भाग्य सभेमुळे उजळले़ गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खड्ड्यांनी व्यापला होता़ तो आता गुळगुळीत झाला आहे़ त्याचबरोबर सभास्थळाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावरील खड्डेही बुजविण्यात आले होते़ कौठा परिसरातील सर्व दुकानदार आणि रहिवाशांची माहिती यंत्रणेने यापूर्वीच घेतली होती़ सभा मोकळ्या मैदानात होणार असल्यामुळे साप निघण्याची शक्यता लक्षात घेता सर्पमित्रांची पंधरा जणांची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली होती़ साप पकडण्याच्या अवजारासह ते मैदानात ठिकठिकाणी उभे होते़ त्यासाठी पोलिसांकडून त्यांना विशेष पास देण्यात आली होती़ परंतु, या सर्पमित्रांच्या हाती एकही साप लागला नाही़ जागोजागी नाकाबंदी, पार्कींगची व्यवस्था असल्याने नागरिकांना सभास्थळी जाणे सोपे झाले़ सभेसाठी गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांसह अख्खी यंत्रणा राबत होती़ सभेसाठी चार जिल्ह्यांतून मोठा पोलीस फौजफाटा बोलाविण्यात येत होता़ त्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक होती़ पोलिसांना मुक्कामासाठी कौठा भागातील ओम गार्डन येथे व्यवस्था करण्यात आली होती़
मोदींसाठी रक्तदाते ठेवले होते राखीव
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असून त्यांच्याच रक्तगटाचे १५ पोलीस कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते़ या सर्व कर्मचा-यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली होती़ त्यानंतर मोदी येण्यापूर्वी एक दिवस अगोदर या सर्वांना आरामासाठी रुग्णालयात वातानुकूलित खोल्या देण्यात आल्या होत्या़ हे कर्मचारी रुग्णालयातच थांबतील़, यावर लक्ष ठेवण्यासाठी एका अधिका-याची नेमणूक करण्यात आली होती़
२०१४ नंतर बदलला व्यासपीठाचा आकार
२०१४ पूर्वी जवळपास ३८ वर्षांहून अधिक काळ पंतप्रधानांच्या सभांसाठी १२ बाय १२ या आकाराचे व्यासपीठ उभारण्यात येत होते़ या व्यासपीठावर मोजून चार किंवा गरज पडल्यास पाच खुर्च्या टाकण्यात येत होत्या़ परंतु, २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर व्यासपीठाच्या आकाराची ही परंपरा खंडित करण्यात आली़ आता सभेच्या स्वरुपानुसार व्यासपीठाचा आकार कमी किंवा जास्त केला जातो़
पोलीस अधीक्षकांचे दररोज जागरण
चारही जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी यासह प्रशासनाशी संपर्क ठेवून नियोजनाची जबाबदारी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी लीलया पार पाडली़ त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून पोलीस अधीक्षक जाधव हे दररोज रात्री तीन वाजेपर्यंत कार्यालयात तळ ठोकून होते़ तीन वाजता घरी गेल्यानंतर पाच वाजेपर्यंत आराम अन् त्यानंतर पुन्हा सभेच्या बंदोबस्तासाठी नियोजनात अशी त्यांची दिनचर्या होती़

Web Title: After the meeting of Modi, the officer take relife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.