गडकरी की ठाकरे... विकासकामे आणि परंपरेच्या लढतीत कोण मारणार बाजी?;

By योगेश पांडे | Published: April 9, 2024 10:02 AM2024-04-09T10:02:52+5:302024-04-09T10:03:32+5:30

गडकरी विरुद्ध ठाकरे थेट लढत, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची एकजूट

Nitin Gadkari or Vikas Thackeray... Who will win in the battle of development and tradition?; | गडकरी की ठाकरे... विकासकामे आणि परंपरेच्या लढतीत कोण मारणार बाजी?;

गडकरी की ठाकरे... विकासकामे आणि परंपरेच्या लढतीत कोण मारणार बाजी?;

योगेश पांडे

नागपूर : हायप्रोफाईल नागपूरलोकसभा मतदारसंघात २६ उमेदवार रिंगणात असले तरी केंद्रीय मंत्री व भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत दिसून येत आहे. गडकरी यांनी यावेळी पाच लाख मतांनी निवडून येऊ, असा दावा केला असून विकास ठाकरे यांच्यासाठी मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसचे पदाधिकारी प्रचाराला भिडल्याचे चित्र आहे.

संघभूमी व दीक्षाभूमीचा मतदारसंघ अशी नागपूरची ओळख आहे. या मतदारसंघावर २०१४ पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. विलास मुत्तेमवार यांनी येथून हॅटट्रिकदेखील साधली होती. नंतर २०१४ व २०१९ मध्ये नितीन गडकरी यांनी येथून विजय मिळविला. नागपुरात जातीय समीकरणांची विविधता आहे. कुणबी, तेली, हलबा, अनुसूचित जाती, हिंदी भाषिक, मुस्लीम प्रभाव असलेले पट्टे आहेत. २०२४ च्या निवडणुकीची भाजपने अगोदरपासूनच तयारी सुरू केली. बूथप्रमुख मोहिमेच्या माध्यमातून सातत्याने गृहसंपर्क सुरू होता. याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले होते. तळागाळात प्रचारावर भाजपकडून भर देण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेस संघटनेत मधल्या काळात शिथिलता आली होती. मात्र निवडणूक जाहीर होताच उत्साह निर्माण झाला आहे. गटातटाचे राजकारण विसरून काँग्रेस नेते ठाकरे यांच्या प्रचारासाठी एकत्रित आले आहेत. विकास ठाकरे यांची स्वत:ची वेगळी व्होटबँक असून नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

अल्पसंख्याक, अनुसूचित जातीच्या मतांवर भर
भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांची पारंपरिक व्होटबँक आहेच. मागील काही निवडणुकांमध्ये बसपा, एआयएमएआयएम या पक्षांकडे अनुसूचित जाती व मुस्लिमांची मते गेली होती. यंदा ही मते आपल्याकडे वळावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच गडकरींचे कुटुंबीय अल्पसंख्याक वस्तीमध्ये जाऊन संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून मध्य व उत्तर नागपुरात जोर लावण्यात येत आहेत. याशिवाय ओबीसी मतांवरदेखील बरेच काही अवलंबून आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

भाजपकडून मागील १० वर्षांत या मतदारसंघात करण्यात आलेल्या विकासकामांच्या नावावर मते मागण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी तर गडकरी यांच्या नावानेच प्रचार सुरू आहे.
 ‘स्मार्ट सिटी’ असली तरी शहरात अनेक मूलभूत समस्या कायम आहेत. अगदी पॉश भागांनादेखील पुराचा मोठा फटका बसला होता. काँग्रेसकडून या मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे.
नागपुरात विकासकामे झाली तरी मोठ्या कंपन्या, उद्योग व रोजगारनिर्मिती हे मुद्दे काँग्रेसकडून उचलण्यात येत आहेत. भाजपकडून आकडेवारी सादर करत या सर्व गोष्टी झाल्या असल्याचा दावा केला जात आहे.

२०१९ मध्ये काय घडले?
नितीन गडकरी     भाजप (विजयी)    ६,६०,२२१
नाना पटोले    काँग्रेस    ४,४४,२१२
मोहम्मद जमाल    (बसपा)    ३१,७२५
नोटा    -    ४,५३८

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील स्थिती

विजयी उमेदवार    पक्ष (मतदारसंघ)        टक्के
देवेंद्र फडणवीस     भाजप (दक्षिण-पश्चिम नागपूर)         ५६.८६ %
मोहन मते         भाजप (दक्षिण नागपूर)          ४३.६२ %
कृष्णा खोपडे     भाजप (पूर्व नागपूर)         ५२.३५ %
विकास कुंभारे     भाजप (मध्य नागपूर)             ४६.३७ %
विकास ठाकरे     कॉंग्रेस (पश्चिम नागपूर)         ४५,६५ %
नितीन राऊत     काँग्रेस (उत्तर नागपूर)         ४४.३५ %

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के
२०१४     नितीन गडकरी     भाजप     ५,८७,७६७     ५४.१३ %
२००९     विलास मुत्तेमवार     काँग्रेस     ३,१५,१४८     ४१.७२ %
२००४      विलास मुत्तेमवार     काँग्रेस     ३,७३,७९६     ४७.१७ %
१९९९     विलास मुत्तेमवार      काँग्रेस     ४,२४,४५०     ५२.३८ %
१९९८    विलास मुत्तेमवार      काँग्रेस     ४,८६,९२८     ५७.४१ %

गेल्यावेळी विधानसभा मतदारसंघात कुणाचा होता जोर ?
नितीन गडकरी - भाजप 
nदक्षिण-पश्चिम नागपूर 
१,२०,१८५ 
nदक्षिण नागपूर
१,१४,९४५
nपूर्व नागपूर) 
१,३५,४५१
nपश्चिम नागपूर
१,०२,९१६
nमध्य नागपूर 
९६,३४६
नाना पटोले - कॉंग्रेस 
nउत्तर नागपूर
९६,६९१ 


 

Web Title: Nitin Gadkari or Vikas Thackeray... Who will win in the battle of development and tradition?;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.